आता ऊर्जा कार्यक्षम कृषी पंपांनाच मिळणार वीजपुरवठा

By Admin | Published: May 20, 2017 01:32 AM2017-05-20T01:32:19+5:302017-05-20T01:32:19+5:30

ऊर्जामंत्र्यांची घोषणा : नवीन पंपांसाठी देणार ५० टक्के अनुदान

Now power efficient agricultural pumps will get power supply | आता ऊर्जा कार्यक्षम कृषी पंपांनाच मिळणार वीजपुरवठा

आता ऊर्जा कार्यक्षम कृषी पंपांनाच मिळणार वीजपुरवठा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विजेची बचत व्हावी यासाठी आता यापुढे केवळ ऊर्जा कार्यक्षम (एनर्जी इफिशियन्ट) कृषी पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच नवीन वीज जोडणी देण्यात येईल. मंजूर भारापेक्षा अधिक वीज खेचणारे जुने पंप असलेल्या शेतकऱ्यांकडून ते घेऊन त्यांना कमी वीज खेचणारे नवीन पंप शासनाकडून ५० टक्के अनुदानावर देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी शुक्रवारी येथे केली .
महावितरणच्या अकोला परिमंडळ अंतर्गत तीन उपकेंद्र व नवनिर्मित अकोट विभागाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी येथील विद्युत भवनच्या प्रांगणात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून बावनकुळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. श्रीकांत देशपांडे, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. बळीराम सिरस्कार, आ. रणधीर सावरकर, जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, तेल्हारा नगराध्यक्ष जयश्री पुुंडकर, मूर्तिजापूर नगराध्यक्ष मोनाली गावंडे, बाळापूर नगराध्यक्ष ऐनोद्दिन खतीब, पातूर नगराध्यक्ष प्रभा कोथळकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार (प्रभारी), जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यापुढे नवीन विद्युत पुरवठा देताना ऊर्जा कार्यक्षम पंपाची अट घालण्यात येणार आहे. हे पंप नसतील, त्यांना वीजपुरवठा देण्यात येऊ नये, असे आदेशच त्यांनी यावेळी तत्पूर्वी, पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांनी शहरातील वीज समस्यांकडे उर्जामंत्र्यांचे लक्ष वेधले. अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी प्रास्ताविकातून महावितरणच्या कामांची माहिती दिली. त्यानंतर आमदार रणधीर सावरकर यांनी भाजपा सरकारच्या कार्यक्षम प्रणालीमुळे वीज समस्यांचे प्रमाण अतिशय कमी झाल्याचे समाधान व्यक्त केले. येणाऱ्या काळात कृषीपंपाची प्रतीक्षा यादी रद्द होऊन सर्वांना मुबलक वीज मिळेल असा आशावाद व्यक्त केला. खासदार संजय धोत्रे यांनीही विजेच्या प्रश्नावर सरकारच्या कामगीरीचे कौतुक करीत उर्जामंत्री धडाडीने निर्णय घेत असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांच्यासह महावितरण व महापारेषणचे अभियंता उपस्थित होते.

जनता दरबारात न येण्यासाठी गळ

ऊर्जामंत्र्यांच्या दरबाराचा धसका महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या जनता दरबारात आपली नाचक्की होऊ नये, यासाठी महावितरणच्या काही अधिकाऱ्यांनी गत दोन दिवसांपासून तक्रारकर्त्यांना या दरबारात येऊ नये, अशी गळ घालत होते, असा खुलासा काही तक्रारकर्त्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या समक्ष केल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार ऐकून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे संतप्त झाले व त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा समाचार घेऊन त्यांना ‘शो कॉज’ बजावण्याचे आदेश दिले.

आॅनग्रीड सोलर पॅनल युनिट द्या!
मनपाला वीज देयकापोटी लाखो रुपये देयक अदा करावे लागते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेत आॅनग्रीड सोलर पॅनल युनिट कार्यान्वित केल्यास विजेची मोठी बचत होणार असल्याचे मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी ऊर्जा मंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

२० कोटींच्या एलईडीचे काम रद्द करा!
२० कोटींच्या निधीतून शहरात उभारलेल्या जाणाऱ्या एलईडी पथदिव्यांचे काम केंद्र शासनाच्या ‘ईईएसएल’ कंपनीला का दिले नाही, असा सवाल उपस्थित करीत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर काम रद्द करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल, आयुक्त अजय लहाने यांना दिले. त्यावर एलईडीच्या कामाची निविदा मंजूर करून कंपनीने कामदेखील सुरू केल्याची माहिती महापौर अग्रवाल यांनी दिली असता आजपर्यंत कंपनीने जेवढे काम केले, त्या बदल्यात मोबदला देऊन काम रद्द करण्याची सूचना ऊर्जा मंत्र्यांनी दिली. ऊर्जा मंत्र्यांच्या सूचनेमुळे एलईडीचे काम रद्द होते की कायम ठेवल्या जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Now power efficient agricultural pumps will get power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.