आता अकोल्यातील धार्मिक स्थळं ८ जानेवारीनंतर हटणार
By Admin | Published: January 5, 2016 02:00 AM2016-01-05T02:00:11+5:302016-01-05T02:00:11+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्य़ाचे प्रकरण कोर्टात.
अकोला: शहरातील धार्मिक स्थळं स्वत:हून काढण्यासाठी महापालिकेने संबंधित विश्वस्तांना ४ जानेवारीची मुदत दिल्यानंतर ५ जानेवारीपासून प्रशासनाकडून धार्मिक स्थळं हटविण्याची कारवाई होणार होती. या कारवाईला ८ जानेवारीनंतर सुरुवात केली जाणार आहे. यादरम्यान, वाशिम बायपास परिसरात उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्य़ाप्रकरणी संबंधितांनी स्थानिक न्यायालयात धाव घेतली असून, मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शहरात विविध धर्मियांची धार्मिक स्थळे आहेत. काही धार्मिक स्थळे नियमबाह्यरीत्या उभारण्यात आल्याने विकास कामे करताना महापालिका प्रशासनाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. काही बहाद्दरांनी चक्क रस्त्यालगत तसेच नाल्यांवर पूज्यनीय देवता, व्यक्तींचे पुतळे, प्रतिमा बसविल्या आहेत. अशा प्रतिमा, पुतळ्य़ांची रात्री-अपरात्री कोणतीही सुरक्षा नसल्याने समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता, सर्वच प्रकारची धार्मिक स्थळे हटविण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केले आहेत. तसेच कारवाईचा अहवाल प्रत्येक पंधरा दिवसांनी सादर करण्याचे निर्देश आहेत. यानुसार मनपाने पहिल्या टप्प्यात २00९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांचा समावेश केला. संबंधित विश्वस्तांनी स्वत:हून धार्मिक स्थळं हटविण्यासाठी ४ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली. ५ जानेवारीनंतर शहरात झोननिहाय स्थळं हटविण्याची कारवाई करण्याचा आदेश मनपा आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकार्यांना दिला होता. मात्र ५ जानेवारी रोजी काही अपरिहार्य कारणास्तव पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने कळविले असून, स्वत: आयुक्त लहाने ८ जानेवारीपर्यंत बाहेरगावी असल्याची माहिती आहे. यामुळे किमान ८ जानेवारीपर्यंत धार्मिक स्थळे उभारणार्यांना किंचित दिलासा मिळाला आहे. पुतळा धार्मिक स्थळांमध्ये कसा? सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळे हटविण्याचा आदेश महापालिकेला दिलस आहे. २00९ नंतर उभारण्यात आलेल्या प्रशासनाच्या पहिल्या यादीत वाशिम बायपासस्थित सिद्धार्थ वाडीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्य़ाचा समावेश आहे. धार्मिक स्थळांच्या व्याख्येत पूज्यनीय व्यक्तींच्या पुतळ्य़ाचा समावेश होतो का, अशी विचारणा शहरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे सोमवारी केली. तसेच या प्रकरणी स्थानिक न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.