आता वर्ग १ ते १२ चा अभ्यासक्रम तयार करणार एकच समिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2016 02:00 AM2016-01-06T02:00:02+5:302016-01-06T02:00:02+5:30
अभ्यासक्रमात येणार सुसूत्रता.
विवेक चांदूरकर/ वाशिम : आतापर्यंत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकचा शालेय अभ्यासक्रम तीन वेगवेगळ्या समित्या तयार करीत होत्या. आता मात्र एकच समिती वर्ग एक ते बारापर्यंतचा अभ्यासक्रम तयार करणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात सुसूत्रता व एकवाक्यता आणण्यास मदत होणार आहे.
राज्यात शालेय अभ्यासक्रम अभ्यास मंडळाच्यावतीने तयार करण्यात येतो. या अभ्यासक्रमात ठराविक कालावधीनंतर बदल करण्यात येतो. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण विभागाने शालेय अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम तयार करीत असताना किंवा अभ्यासक्रमात बदल करीत असताना आतापर्यंत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या समित्या तयार करीत होत्या. त्यामुळे पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पाचवीचा अभ्यासक्रम हा वेगळा असायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. त्याचप्रमाणे दहावीनंतर अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम वेगळा राहत होता. त्यामुळे पुन्हा विद्यार्थी संभ्रमात पडत होते. त्यामुळे अभ्यासक्रमात सुसूत्रता आणण्याकरिता आता पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम एकच समिती गठीत करणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमात सुसूत्रता येणार असून, विद्यार्थ्यांना सलग शिक्षण घेणे सोपे होईल, तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासही मदत होईल.
आतापर्यंत प्राथमिक व माध्यमिकचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या समित्या तयार करीत होत्या. आता मात्र वर्ग १ ते १२ पर्यंतच्या शिक्षणाकरिता एकच समिती तयार करण्यात आली असून, यात विविध तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती आपसामध्ये समन्वय ठेवून अभ्यासक्रम तयार करणार असल्याचे शिक्षण विभागाचे सचिव नंदकु मार यांनी सांगीतले.
विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती
अभ्यासक्रम तयार करण्याकरिता त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व तज्ज्ञांमध्ये समन्वय असणार आहे. या समन्वयातूनच सलग व मागील वर्गातील अभ्यासक्रमाशी निगडित अभ्यासक्रमच पुढील वर्गात दिला जाणार आहे.