आता भाजपाची यंत्रणा ठेवणार स्वच्छतेच्या कामांवर ‘वॉच’, महापालिकेने सोपवली सफाई कर्मचाऱ्यांची यादी

By आशीष गावंडे | Published: October 30, 2023 08:18 PM2023-10-30T20:18:51+5:302023-10-30T20:19:37+5:30

सणासुदीच्या दिवसात शहरात स्वच्छतेच्या कामाचा बोजवारा उडाल्यामुळे सर्वत्र घाण व कचरा तुंबल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Now the BJP system will keep a watch on the sanitation works, the list of sanitation workers assigned by the municipality | आता भाजपाची यंत्रणा ठेवणार स्वच्छतेच्या कामांवर ‘वॉच’, महापालिकेने सोपवली सफाई कर्मचाऱ्यांची यादी

आता भाजपाची यंत्रणा ठेवणार स्वच्छतेच्या कामांवर ‘वॉच’, महापालिकेने सोपवली सफाई कर्मचाऱ्यांची यादी

अकोला: सणासुदीच्या दिवसात शहरात स्वच्छतेच्या कामाचा बोजवारा उडाल्यामुळे सर्वत्र घाण व कचरा तुंबल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे अकोलेकरांमधून मनपा प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही बाब लक्षात घेता यापुढे शहर स्वच्छतेच्या कामांवर भाजपाची यंत्रणा ‘वाॅच’ठेवणार आहे. या संदर्भात भाजपने मनपा प्रशासनाकडे सफाई कर्मचाऱ्यांची यादी मागितली असता प्रशासनाने सदर यादी भाजपकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे.

शहरवासीयांना पाणीपुरवठा, पथदिवे, दैनंदिन साफसफाई, अतिक्रमण मुक्त रस्ते आदी मूलभूत सोयी-सुविधा देण्याची महापालिका प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. एकीकडे शहरवासी मनपाकडे वर्षाकाठी १०७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा करीत असताना त्या बदल्यात नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविली जात नसल्याची बाब दिसून येत आहे. वर्तमानस्थितीत शहरात साफसफाईच्या कामाचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते असो वा प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांची दैनंदिन साफसफाई होत नसल्यामुळे सर्वत्र माती साचली आहे. सर्विस लाईन, नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने त्या ठिकाणी घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. नाल्यांची साफसफाई होत नसल्यामुळे सांडपाणी तुंबले असून त्यामध्ये डासांची पैदास वाढली आहे. यामुळे शहरात विविध साथ रोगांचा उद्रेक झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात शहरातील घाण व कचऱ्याचे किळसवाणे चित्र पाहता मनपा प्रशासनासोबतच सर्वपक्षीय माजी नगरसेवकांच्या विरोधात नागरिक उघडपणे व्यक्त होऊ लागले आहेत. ही बाब लक्षात घेता मुख्य रस्त्यांच्या साफसफाईच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपने पुढाकार घेत मनपा प्रशासनाकडे सफाई कर्मचाऱ्यांची यादी मागितली होती. ही यादी प्रशासनाच्यावतीने भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आहे.

भाजपच्या भूमिकेमुळे मनपाची कसाेटी
मनपाच्या सफाइ कर्मचाऱ्यांनी प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांसह प्रमुख रस्त्यांची दैनंदिन झाडपूस करणे क्रमप्राप्त असताना तसे हाेत नसल्यामुळे रस्ते धुळीने माखले आहेत. दुभाजकांलगत मातीचे ढिग साचले आहेत. तसेच मुख्य रस्त्यांलगत कचरा तुंबल्याचे चित्र आहे. यामुळे अकाेलेकरांना धुळीचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी भाजपच्या भूमिकेमुळे मनपाची कसाेटी लागणार असल्याचे दिसत आहे. 

आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचा भरणा
प्रमुख रस्त्यांच्या साफसफाइसाठी प्रशासनाने आस्थापनेवरील सफाइ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वर्तमानस्थितीत मनपाच्या आस्थापनेवर ७४७ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अनेक कर्मचारी संघटनेच्या नावाखाली कर्तव्याकडे पाठ फिरवतात. भाजपच्या भूमिकेमुळे अशा कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे.

Web Title: Now the BJP system will keep a watch on the sanitation works, the list of sanitation workers assigned by the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला