आता महापालिका हद्दीतही होणार घरोघरी शौचालय
By admin | Published: June 1, 2015 02:35 AM2015-06-01T02:35:06+5:302015-06-01T02:35:06+5:30
शासनाची मनपाला सूचना; १२ हजार रुपये मिळणार अनुदान.
आशीष गावंडे / अकोला : अस्वच्छता व घाणीमुळे पसरणार्या रोगराईवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका क्षेत्रात प्रत्येक घरी वैयक्तिक शौचालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, तशी सूचना जारी करण्यात आली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय उभारणीसाठी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. ज्या नागरिकांच्या घरी शौचालय नसेल, त्यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश शनिवारी राज्यातील मनपा आयुक्तांना देण्यात आले. पावसाळ्य़ात अस्वच्छता व घाणीमुळे जीवघेणे आजार डोके वर काढतात. डायरिया, कावीळ, मलेरियासह विविध आजारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. अशा आजारांवर नियंत्रण मिळवताना आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होते. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागात प्रामुख्याने स्लम एरियामध्ये वैयक्तिक शौचालयांचा अभाव दिसून येतो. शौचालय उपलब्ध नसल्याने नागरिक उघड्यावरच प्रात:विधी आटोपतात. यामुळे आरोग्यास घातक जीवजंतूचा फैलाव झपाट्याने होऊन नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. ग्राम विकास मंत्रालयाने ह्यहगणदरीमुक्त ग्राम अभियानह्ण राबविले. त्यानंतरही सुधारणा होत नसल्याचे पाहून ह्यगुड मॉर्निंग पथकाह्णच्या माध्यमातून नागरिकांवर कारवाया केल्या. कारवाई करणे हा प्रभावी उपाय नसल्याचे शासनाच्या लक्षात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे फलीत ध्यानात घेता राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये सर्वात प्रथम वैयक्तिक शौचालयांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. या उपक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रात वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या नागरिकांच्या घरी वैयक्तिक शौचालय नसेल, त्यासंदर्भात माहिती संकलित करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत.