आता दिव्यांगांना मिळणार वैश्विक ओळखपत्र
By admin | Published: June 21, 2017 01:32 PM2017-06-21T13:32:39+5:302017-06-21T13:32:39+5:30
अकोला जिल्हय़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रकल्पाची सुरुवात : ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
अकोला: केंद्र शासनाच्या न्याय व सशक्तीकरण विभागातर्फे देशभरातील दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी टप्प्या-टप्प्याने करण्यात येत आहे. अकोला जिल्हय़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. जिल्हय़ातील ऑनलाइन अपंग प्रमाणपत्रधारक दिव्यांगांनी आपली नोंदणी करून अर्ज ऑनलाइन सादर करावा व हे उपयुक्त वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांगांचा राष्ट्रीय डाटाबेस तयार करणे, सर्वांना एकसमान व अद्वितीय असे ओळखपत्र देणे, प्रमाणपत्र वितरणातील पारदर्शकता व कार्यक्षमता वाढविणे, दिव्यांगांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्यात सरलता आणणे या उद्देशाने देशातील सर्व दिव्यांगाना एकाच प्रकारचे वैश्विक ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम प्रत्येक जिल्हय़ात सुरू करण्यात आला आहे. सदर ओळखपत्रे शासकीय महाविद्यालये व जिल्हा स्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत देण्यात येणार आहेत. दिव्यांगांकरिता अतिशय उपयुक्त अशी ही ओळखपत्रे कायमस्वरूपी असून, त्यात संबंधित दिव्यांगांची सर्व माहिती, जसे - वैयक्तिक माहिती, सामाजिक माहिती, आर्थिक स्तर, अपंगत्वाचा प्रकार, पत्ता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आदी अंतभरूत राहणार आहे. सदर ओळखपत्र हे स्मार्टकार्ड स्वरूपात असून, सोबतच अपंगत्वाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
असे मिळवा यूडीआयडी ओळखपत्र
इच्छुकांनी शासनाच्या ह्यडब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट स्वावलंबनकार्ड डॉट जीओव्ही डॉट ईनह्ण या संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करावी व नंतर लॉगीन करून त्यात मागितलेली माहिती अचूक भरावी. भरलेल्या माहितीच्या पुष्ट्यर्थ सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. यामध्ये अलीकडच्या काळातील रंगीत छायाचित्र, स्वाक्षरी, आधारकार्ड, ऑनलाइन अपंग प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अनिवार्य आहेत. रहिवासी दाखला व ऑनलाइन अपंग प्रमाणपत्र एकाच जिल्हय़ातील असावे. अर्धवट व अस्पष्ट, चुकीची माहिती असल्यास अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता आहे. कागदपत्रांच्या तपासणीनंतर संबंधित व्यक्तीस ओळखपत्र प्रदान करण्यात येईल. सदर ओळखपत्राची प्रत घरपोच मिळेल.