आता लसीकरणासाठी एक दिवस आधी घ्यावी लागणार अपाॅइंटमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:15 AM2021-05-28T04:15:09+5:302021-05-28T04:15:09+5:30
अकाेला : मनपाच्या अखत्यारीत कार्यरत ‘आरसीएच’ अधिकाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेने ज्येष्ठ नागरिकांना अपाॅइंटमेंट घेण्यासाठी चक्क सकाळी ६ ...
अकाेला : मनपाच्या अखत्यारीत कार्यरत ‘आरसीएच’ अधिकाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेने ज्येष्ठ नागरिकांना अपाॅइंटमेंट घेण्यासाठी चक्क सकाळी ६ वाजता स्लाॅट उघडण्याचा निर्णय घेतला हाेता़ अत्याधुनिक माेबाइल हाताळता न येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही प्रक्रिया डाेकेदुखी ठरू लागली हाेती. या तर्कहीन प्रकाराला ‘लाेकमत’ने वाचा फाेडल्यानंतर मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी अपाॅइंटमेंटसाठी सकाळी ६ वाजता नव्हे तर एक दिवस आधी सायंकाळी ७ वाजता स्लाॅट उघडण्याचे निर्देश जारी केले आहेत़
काेराेनाला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे हा उद्देश समाेर ठेवून मनपा प्रशासनाने नियाेजन करणे अपेक्षित आहे. सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक माेबाइलद्वारे भेडसावणाऱ्या समस्येचे ‘आरसीएच’ विभाग व वैद्यकीय आराेग्य यंत्रणेतील उच्चशिक्षित अधिकाऱ्यांना कवडीचेही साेयरसुतक नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मनपा क्षेत्रात लसीकरणाच्या संदर्भात नियाेजन करून निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका प्रशासनाला आहे, परंतु लसीकरणाच्या वेळेत व स्लाॅट उघडण्याच्या नियमांत बदल करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये गाेंधळाची स्थिती निर्माण करण्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रयत्न दिसून येत आहे़ शासनाने १८ ते ४४ या वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या व पहिल्या डाेसला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. यादरम्यान, ऑनलाइन अपाॅइंटमेंट घेताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब सर्वश्रुत असली तरीही मनपाच्या आराेग्य यंत्रणेने सकाळी ६ वाजता स्लाॅट उघडण्याचा अचंबित करणारा निर्णय घेतला. या प्रकाराला ‘लाेकमत’ने वाचा फाेडल्यानंतर प्रशासनाला स्लाॅट उघडण्याच्या निर्णयांत बदल करावा लागला आहे़
दुसऱ्या डाेससाठी टाेकन बंद
मध्यंतरी लसीकरणासाठी टाेकन पद्धत सुरू करण्यात आली हाेती. नंतर ऑनलाइन अपाॅइंटमेंटमुळे टाेकन पद्धत बंद करण्यात आली. यादरम्यानच्या काळात दुसऱ्या डाेससाठी टाेकन पद्धत सुरू करण्याचा निर्णय आराेग्य यंत्रणेने घेतला. आता पुन्हा ही पद्धत बंद करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. टाेकन पद्धत सुरू अथवा बंद करण्याचा निर्णय एक दिवस आधी घेतला जात असून ही प्रक्रिया काही ठरावीक राजकारणी, उद्याेजक, बडे व्यापारी व डाॅक्टरांसाठीच असल्याची माहिती आहे़
फ्रंटलाइन वर्कर म्हणजे काेण?
मागील तीन दिवसांपासून मनपाच्या ‘आरसीएच’ व आराेग्य यंत्रणेच्या स्तरावर फ्रंटलाइन वर्करसाठी काही डाेस राखीव ठेवले जात आहेत. या वर्करमध्ये नेमक्या काेणत्या श्रेणीतील नागरिकांचा समावेश हाेताे, याबद्दल अकाेलेकर अनभिज्ञ आहेत़ याविषयी आयुक्त निमा अराेरा यांचीही दिशाभूल केली जात असल्याची माहिती आहे़