न.प. कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी पदाची संधी मिळणार!
By admin | Published: May 22, 2017 01:30 AM2017-05-22T01:30:42+5:302017-05-22T01:30:42+5:30
सहा वर्षांनंतर जिल्हाबाह्य होणार बदली
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : नगर परिषद कर्मचाऱ्यांना विभागांतर्गत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून थेट मुख्याधिकारी पदावर काम करण्याची संधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी जिल्ह्यात, तर सहा वर्षांनंतर जिल्हाबाह्य बदली करण्यात येणार असून, त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार नगरविकास प्रशासन संचालकांना देण्यात आले आहेत.
शासनाने नगरविकास प्रशासन संचालकांना बदल्याचे अधिकार दिले आहेत. कायद्याप्रमाणे प्रशासन चालण्यासाठी संवर्ग कर्मचाऱ्यांच्या एका नगरपरिषदेत तीन वर्ष जिल्ह्यात सहा वर्षांची सेवा राहणार असल्याने अनेक सेवानिवृत्तीच्या मार्गावरील कर्मचाऱ्यांची जिल्हाबाह्य बदली होणार आहे. यातच शासनाने राज्यस्तरीय संवर्गातून मुख्याधिकारी श्रेणी २ (गट ब) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीची संधी दिली आहे. न. प. मुख्याधिकारी पदासाठी राज्यस्तरीय संवर्गात सात वर्ष नियमित सेवा, वय ४५ वर्षांपेक्षा कमी व पदवीधर असलेले कर्मचारी पात्र ठरणार आहेत. राज्यातील नगरपालिकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बिंदूनामावली स्थानिक पातळीवरच ठरून कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात होती. कर्मचाऱ्यातून अधिकारी झाल्यावर वर्षानुवर्षे एकाच नगरपालिकेत नोकरी करणाऱ्यांना शासनाकडून चाप बसणार आहे. एकाच नगरपालिकेत तीन वर्ष काम केल्यानंतर जिल्ह्यात, तर सहा वर्ष नोकरी झाल्यानंतर जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येणार आहे. दर तीन वर्षांनी दुसऱ्या नगरपरिषदेत बदली असल्याने पूर्वी लागलेल्या नगरपालिकेतच सेवानिवृत्ती हे धोरण बदलणार आहे. संवर्गातूनच पदोन्नतीने विभागीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण करून कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी या उच्च पदावर काम करण्याची संधी शासनाने दिली आहे.