कुपोषण मुक्तीसाठी तालुकास्तरावर ‘एनआरसी’ नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 02:46 PM2019-07-02T14:46:21+5:302019-07-02T14:46:25+5:30
अकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे
- प्रवीण खेते
अकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे. ग्रामीण भागात ‘व्हीसीडीसी’ अकार्यक्षम ठरत असल्याने कुपोषण मुक्तीचा हा लढा तोकडा ठरत असून, राज्यभरात तालुकास्तरावर एनआरसी केंद्र सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे
दुर्गम आणि आदिवासी भागासह शहरी भागातही कुपोषणाचे लोण पसरत आहे. यावर मात करण्यासाठी पोषण आहार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत जिल्हास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्र आहे; मात्र रोजगार बुडवून येथे मुलांना ठेवणे ग्रामीण भागातील पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे पालकही या ठिकाणी येण्यास नकार दर्शवितात. ग्रामीण भागात ‘व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’ म्हणजेच व्हीसीडीसी आहेत; मात्र त्यांचे कार्य प्रभावी नाही, अशा परिस्थितीत कुपोषणाचा लढा तोकडाच ठरत आहे. त्यामुळे किमान तालुकास्तरावरदेखील एनआरसी केंद्र आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
काय आहे ‘एनआरसी’ केंद्र
कुपोषित बालकांना निगराणीत ठेवून त्यांना आवश्यक पोषण आहार देऊन या बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकासासाठी पोषण पुनर्वसन केंद्र राज्यात जिल्हास्तरावर कार्यरत आहे. यामध्ये कुपोषित बालकांना १४ दिवसांसाठी डॉक्टरांच्या निगराणीत ठेवले जात असून, या कालावधीत कुपोषित बालकांच्या वजनात किमान १५ टक्क्यांची वाढ केली जाते. पोषण आहारासोबतच कुपोषित बालकांच्या बौद्धिक विकासासाठीही विविध प्रयत्न केले जातात.
दुर्गम भागात ‘एनआरसी’ पोहोचलेच नाही
बहुतांश ग्रामीण भागात विशेषत: दुर्गम भागात पोषण पुनर्वसन केंद्राची आवश्यक ती माहिती पोहोचली नाही. शिवाय,
राज्यभरात केवळ जिल्हास्तरावर एनआरसी आहे. त्यामुळे या ठिकाणी १४ दिवसांचा मुक्काम ग्रामीण भागातील पालकांना परवडणारा नाही. म्हणूनच या ठिकाणी येण्यास पालकांचा नकार असतो. अनेकांसाठी गाव सोडून शहरात येणेही शक्य नसल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात.
ग्रामीण स्तरावर प्रभावी उपाययोजनांची गरज
शहरी भागात विशेष सुविधा आहे; मात्र त्या ग्रामीण भागात पोहोचत नाहीत. त्यामुळे किमान तालुकास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्राची आवश्यक आहे. यासाठी शासनातर्फे प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.
हे आहेत ‘एनआरसी’चे फायदे
- बालकांचे वजन वाढण्यासाठी योग्य पोषण आहार
- शारीरिक विकासासोबत बौद्धिक विकास
- मातांना पौष्टिक पाककृतीचे प्रशिक्षण
कुपोषण मुक्तीसाठी ‘एनआरसी’ची महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये बालकांच्या शारीरिक विकासासोबतच बौद्धिक विकासावरही विशेष लक्ष दिले जाते. या ठिकाणी प्रत्येक कुपोषित बालक पोहोचावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला