‘नरेगा ‘ लाभार्थ्यांच्या अडचणींचा घेतला जाणार शोध; अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर मेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:53 PM2018-03-07T18:53:26+5:302018-03-07T18:53:26+5:30
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेऊन, उपाययोजना करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत राबविण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेऊन, उपाययोजना करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत राबविण्यात येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने सिंचन विहिरी, फळबाग लागवड, विहिरींचे पुनर्भरण व इतर कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अनेक प्रकारच्या अडचणी आणि तक्रारी असतात. त्यानुषंगाने ‘नरेगा’ अंतर्गत लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि अडचणींवर तातडीने उपाययोजना करून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर संबंधित पंचायत समितींमध्ये लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत ९ मार्चपासून राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुका स्तरावर घेण्यात येणाºया नरेगा लाभार्थ्यांच्या मेळाव्यात नरेगा उपजिल्हाधिकाºयांसह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असून, मेळाव्यांमध्ये लाभार्थ्याच्या अडचणींचा शोध घेण्यात येणार आहे., तसेच अडचणी लक्षात घेऊन कामे मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
तलाठ्यांकडून लाभार्थ्यांना नोटीस !
‘नरेगा’ अंतर्गत लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मेळाव्याला लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याबाबत जिल्ह्यातील नरेगा अंतर्गत लाभार्थ्यांना तलाठ्यांकडून नोटीस देण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी (नरेगा ) अशोक अमानकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले.
नरेगा अंतर्गत कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणी, संबंधित यंत्रणांसंदर्भात तक्रारी जाणून घेणे आणि कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर लाभार्थ्याचे मेळावे घेण्यात येणार आहेत.
-अशोक अमानकर, उपजिल्हाधिकारी (नरेगा),अकोला.