एनआरएचएम अधिकारी, कर्मचारी महासंघाचे १७ मेपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:14+5:302021-05-10T04:18:14+5:30
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांचे एकतर बिनशर्त समायोजन करा, अन्यथा योजना रद्द करून सर्वांना ...
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांचे एकतर बिनशर्त समायोजन करा, अन्यथा योजना रद्द करून सर्वांना घरीच बसवा, अशी मागणी करत एनआरएचएम अधिकारी, कर्मचारी महासंघाने सात दिवसांचा अल्टिमेटम देत १७ मेपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आयुष्याचे महत्त्वाचे १५ वर्षे आरोग्यसेवेत दिले आहेत. त्यांच्या बाबत शासनामार्फत निर्णय घेण्यात येईल या आशेवर त्यांनी अद्यापपर्यंत आरोग्यसेवा चोख बजावली. यापूर्वी एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी वारंवार आंदोलन, उपोषण केले; परंतु सर्व कर्मचाऱ्यांची महत्त्वाच्या मागणीकडे शासनाचे लक्षपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अधिकारी, कर्मचारी महासंघाने केला आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्यसेवा पदभरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ४० टक्के आरक्षण द्यावे तसेच प्रतिवर्ष ३ गुण आणि सेवा कालावधीनुसार वयोमर्यादेत शिथिलता देण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र, यापैकी कोणतीही शिफारस मान्य न करता अभ्यास समितीच्या अहवालाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात १६ मेपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा १७ मेपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन करू, असा इशारा एनआरएचएम अधिकारी, कर्मचारी महासंघ एनआरएचएम अधिकारी, कर्मचारी महासंघाने राज्य शासनाला दिला आहे.