एनएसयूआयने जाळला शिक्षण मंत्र्यांचा पुतळा

By admin | Published: June 8, 2017 01:35 AM2017-06-08T01:35:42+5:302017-06-08T01:35:42+5:30

शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित: केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेशाला परवानगी देण्याची मागणी

NSUI burnt the Education Minister's statue | एनएसयूआयने जाळला शिक्षण मंत्र्यांचा पुतळा

एनएसयूआयने जाळला शिक्षण मंत्र्यांचा पुतळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने अकरावीमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने प्रस्ताव पाठवूनही प्रस्तावाला शासनाकडून परवानगी मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसप्रणित एनएसयूआयने बुधवारी सकाळी ११ वाजता हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले आणि शिक्षण मंत्र्यांनी केंद्रीय पद्धतीने अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश रखडणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर एनएसयूआयने आंदोलनाचा पवित्रा घेत, शिक्षण संचालकांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बुधवारी ‘लोकमत’ने केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश होऊ नयेत, यासाठी संस्थाचालक आणि शिकवणी वर्ग संचालक लॉबिंग करीत असल्याचे वृत्त प्रकाशित केले.
या वृत्ताची दखल घेत, एनएसयूआयने बुधवारी सकाळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने दिले जावेत, अशी मागणी एनएसयूआयने केली होती. शिक्षण विभागाने सुद्धा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी नियोजन केले आणि प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविला; परंतु संचालकांनी प्रस्तावाला अद्यापपर्यंत मान्यता दिली नसल्याने, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात धिंग्रा चौकात आंदोलन करून शिक्षण मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि प्रस्तावास परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. आंदोलनामध्ये जिल्हा महासचिव अंकुश तायडे, शहर उपाध्यक्ष सारंग शिंदे, बाळापूर शहराध्यक्ष शिवम तिडके, सागर ठाकरे, कुलदीप पाटील, कुपाल झांबरे, गुंजन कावळे, अमोल डोंगरे, छोटू कवळे, श्रीकांत बागडे, वैभव सुडकर, निखिल लोखंडे, अक्षय गडेकर, सोहेल खान, ऋषिकेश जामोदे, अभिजित देशमुख, शुभम बढे, अरजित यादव, श्रेयश ठाकरे, तुषार ढगे, गुमान खान, अंकुश शर्मा, वैभव पाटील, अक्षय लोणकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: NSUI burnt the Education Minister's statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.