परजिल्ह्यातील बसेसची संख्या वाढली; दररोज ४०-४५ फेऱ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:18 AM2021-09-13T04:18:07+5:302021-09-13T04:18:07+5:30
अकोला : निर्बंधांमध्ये सूट मिळाल्याने गत काही दिवसांपासून अकोला आगारात परजिल्ह्यातील बसेसची संख्या वाढली आहे. दररोज ४०-४५ बस इतर ...
अकोला : निर्बंधांमध्ये सूट मिळाल्याने गत काही दिवसांपासून अकोला आगारात परजिल्ह्यातील बसेसची संख्या वाढली आहे. दररोज ४०-४५ बस इतर जिल्ह्यातून अकोला आगारात येत आहेत. यामध्ये बुलडाणा, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आगारातील बसेसची संख्या अधिक आहे.
मागील दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून एसटी महामंडळाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये वारंवार लॉकडाऊन व निर्बंध लागत असल्याने प्रवासी सेवा बंद ठेवावी लागते. परिणामी, एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा रुळावर येत आहे. येथील आगार क्रमांक २ मधून फेऱ्यांची संख्याही वाढली असून, प्रवाशांकडूनही थोड्याफार प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यामध्ये परजिल्ह्यातून अकोला आगारात येणाऱ्या बसेसची संख्याही वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांनाही वेळेवर बस मिळत आहे. तसेच बहुसंख्य पर्याय उपलब्ध होत आहेत.
या फेऱ्या वाढल्या!
नागपूर-औरंगाबाद
खामगाव-अमरावती
चिखली-अमरावती
जळगाव-अकोला
अमरावती-नाशिक
नाशिक-नागपूर
आगाराला दररोज तीन लाखांचे उत्पन्न
निर्बंधांमध्ये आगार क्रमांक २ चे उत्पन्न शून्य होते. अत्यावश्यक सेवेसाठी धावणाऱ्या फेऱ्यांना डिझेल खर्चही पेलविणारा नव्हता. आता प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागल्याने उत्पन्नातही वाढ होत आहे. दररोज ३ लाखांच्या जवळपास उत्पन्न प्राप्त होत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
नादुरुस्त बसेसमुळे चालक-वाहक त्रस्त
मागील काही वर्षांपासून अकोला आगाराला नवीन बसेस मिळाल्या नाहीत. त्यामुळे जुन्या व खिळखिळ्या झालेल्या बसेसच्या भरवशावर प्रवासी वाहतूक करावी लागत आहे. या बसेसमध्ये वारंवार अडचणी येत असल्याने चालक-वाहक त्रस्त झाले आहेत.
‘त्या’ फलकामुळे वाहकांची शर्यत
गत काही काळापासून आर्थिक अडचणीत असलेल्या फेऱ्यांना वाहक चांगले उत्पन्न मिळवून देत आहेत. या वाहकांचे आगाराकडून अभिनंदन करण्यात येत असून, महामंडळाला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या वाहकांच्या नावाचे फलक बसस्थानकात लावण्यात आले आहे. या फलकावर आपलेही नाव झळकावे यासाठी वाहकांची लागली शर्यत आहे.