अकोल्यात कोरोनाबाधितांचा आकडा साडेतीनशे पार; दिवसभरात १४ नवे रुग्ण; दोन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:22 PM2020-05-22T19:22:48+5:302020-05-22T20:04:10+5:30
१४ पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३५५ वर पोहचली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दररोज शहरातील नव-नव्या प्रभागांमध्ये मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवार, २२ मे रोजी दिवसभरात १४ पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३५५ वर पोहचली आहे. दरम्यान, मंगळवारी मृत्यू झालेल्या दोघांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडाही २३ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. शुक्रवारी, बार्शीटाकळी, मुर्तीजापूर व पातूर तालुक्याही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाचा प्रसार संपूर्ण जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येत आहे.
अकोल्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, दररोज मोठ्या संख्यने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३४१ होती. यामध्ये शुक्रवारी १४ जणांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून शुक्रवारी १५८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १४४ अहवाल निगेटिव्ह असून, १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात ४ महिला व १० पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दोघे फिरदौस कॉलनी तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी आहेत. पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जि.प. शाळेतील अलगीकरण कक्षातच होती. तर सायंकाळी जुने शहर, अकोट फैल, गोकुळ कॉलनी जवाहर नगर, मलकापूर अकोला, मुजावरपुरा-पातूर, हमजा प्लॉट वाशिम बायपास येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २२ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. आतापर्यंत २०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १२६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
प्राप्त अहवाल-१५८
पॉझिटीव्ह-१४
निगेटीव्ह-१४४
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३५५
मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२०६
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६