कोविड पॉझिटिव्ह अहवालांची संख्या घटली; मृत्यूचा आलेख मात्र चढताच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 10:37 AM2020-10-09T10:37:11+5:302020-10-09T10:37:17+5:30
CoronaVirus in Akola आठ दिवसांत १३ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागासमोरील आव्हान कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गत सहा महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इतर महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर महिना सर्वाधिक घातक ठरला. त्या तुलनेत आॅक्टोबर महिन्याची सुरुवातही गत महिन्यासारखीच झाली; पण गत आठ दिवसांत कोविड पॉझिटिव्ह अहवालांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. असे असले तरी मृत्यूचे सत्र कायम असून, मागील आठ दिवसांत १३ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागासमोरील आव्हान कायम आहे.
सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी दोन ते तीन रुग्णांचा मृत्यू, तर शंभरपेक्षा जास्त अहवाल पॉझिटिव्ह आले. तुलनेने आॅक्टोबर महिन्याची सुरुवात दिलासादायक झाली. मागील आठ दिवसांत २३६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दररोज तपासण्यात येणाऱ्या अहवालांमध्ये पॉझिटिव्ह अहवालाची संख्या घटली आहे. शिवाय, बरे होणाºया रुग्णांची संख्याही वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ८६.४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला; मात्र दुसरीकडे मृत्यूचे सत्र कायम आहे. सप्टेंबर महिन्याप्रमाणेच आॅक्टोबर महिन्यातही दिवसाला सरासरी दोघांचा मृत्यू होत आहे. मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान असले, तरी सर्वसामान्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. अनेक जण याकडे दुर्लक्ष करून बेफिकिरीने वागतात.
उशिरा उपचार ठरतोय घातक!
व्हायरल फिव्हर की, कोरोना यात संभ्रम असल्याने अनेक रुग्ण त्रास जास्त वाढल्यावर कोरोनाचा उपचार घेत आहेत. उपचार सुरू होईपर्यंत रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणे, शरीरातील आॅक्सिजनची पातळी खालावणे आदी गंभीर समस्या जाणवू लागतात. हा प्रकार जीवघेणा ठरतो.
पॉझिटिव्ह येणाºया रुग्णांचे प्रमाण घटले, तरी बेफिकिरी करून चालणार नाही. लक्षणे दिवसताच पाच दिवसांच्या आत रुग्णांनी चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. कुठलाही आजार अंगावर काढू नये.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला