देशात रक्तदात्यांची संख्या १ टक्क्यापेक्षाही कमी
By admin | Published: September 30, 2015 11:49 PM2015-09-30T23:49:43+5:302015-09-30T23:49:43+5:30
२५ लाख युनीट रक्तसाठा कमी , आज ऐच्छिक रक्तदान दिन.
विवेक चांदूरकर/वाशिम - देशभरात रक्तदानाबाबत जनजागृती करून विशेष मोहीम राबविण्यात येत असली तरी रक्तदात्यांमध्ये मात्र उदासिनताच दिसत आहे. १२८ कोटी लोकसंख्येच्या या देशात वर्षाकाठी केवळ १ कोटी युनीट रक्त संकलीत होत असून, हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. देशात दरवर्षी १.२५ कोटी युनीट रक्ताची गरज भासत असून, २५ लाख रूग्णांना मात्र वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे प्राण गमवावे लागतात. सरकार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रक्तदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येते. रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांपासून ट्रकच्या फलकांपर्यंत विविध म्हणी व सुविचारांव्दारे रक्तदानाबाबत जागृती करण्यात येते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थांमार्फतही रक्तदान शिबीरं घेतली जातात. रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी १ ऑक्टोबर हा दिन ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. तरीही प्रत्यक्षात रक्तदान करणार्यांची संख्या अत्यल्पच आहे. देशाची लोकसंख्या १२८ कोटींपेक्षा जास्त आहे. रक्तदात्यांची संख्या संपूर्ण लोकसंख्येच्या एक टक्काही नाही. देशभरात २0१४- १५ वर्षांमध्ये ६0 हजार रक्तदान शिबीरांतर्गत १ कोटी युनीट रक्त संकलन करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार देशात दरवर्षी रक्तदानाची गरज १.२५ कोटी युनीट एवढी आहे. म्हणजेच दरवर्षी २५ लक्ष युनीट रक्त कमी पडल्याने लाखो रूग्णांना जीव गमवावा लागतो.
महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद देशात अव्वल
राज्यात ३१५ रक्तपेढय़ांतर्गत रक्तसंकलन व रक्तदानाचे काम करण्यात येते. त्यापैकी केवळ ६९ रक्तपेढय़ा शासकीय आहेत. शासकीय रक्तपेढय़ांमध्ये गर्भवती माता तसेच दारिद्य्र रेषेखालील रूग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. २0१४ - १५ मध्ये १५ लक्ष ६५ हजार युनीट रक्त संकलन करण्यात आले. यापैकी ३ लक्ष युनीट रक्त हे शासकीय रक्तपेढय़ांव्दारे करण्यात आले.
महिला मागेच
देशाच्या लोकसंख्येत ५0 टक्के महिला आहेत; मात्र महिलांचे रक्तदानाचे प्रमाण नगण्य आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबीनची कमतरता, वजन कमी असणे यामुळे महिला रक्तदान करू शकत नाहीत. यासोबतच रूढी, परंपरा व सामाजिक रचनेमुळे महिला रक्तदान करण्यास धजावत नाहीत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त साठवणूक केंद्र
आता राज्य रक्तसंक्रमण परिषदेमार्फत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रक्त साठवणूक केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे गाव पातळीपर्यंत रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास रक्तपुरवठा करता येईल.