नॉनकोविड रुग्णांची संख्या वाढली ; जीएमसीतील वॉर्ड हाऊसफुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 11:07 AM2021-02-02T11:07:34+5:302021-02-02T11:10:23+5:30
Akola GMC and Sarvopchar Hospital रुग्णालयात उपचारांसाठी भरती रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णालयांमधील नॉनकोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. मात्र, जानेवारी महिन्यात हळूहळू नॉनकोविड रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागल्याने सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे या काळात बंद करण्यात आलेले वॉर्डही सुरू करण्यात आल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना काळात नॉनकोविड रुग्णांसाठी विशेषत: वयोवृद्ध रुग्णांना घरी बसूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले हाेते. त्यामुळे या काळात रुग्णालयातील नॉन कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. तसेच कोरोना काळात आरोग्य विभागाने कोविड रुग्णांकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे बहुतांश वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कोविड वॉर्डातच ड्युटी लावण्यात आल्याने सर्वोपचार रुग्णालयातील काही वॉर्ड बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, कोरोना काळातील काही नियम शिथिल करण्यात आल्याने सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या वाढली आहे. यासोबतच रुग्णालयात उपचारांसाठी भरती रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने वयोवृद्ध रुग्णांची संख्या जास्त असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
कोरोना काळात उपचारात खंड
अनेक रुग्णांचा कोरोना काळात उपचारात खंड पडल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकांच्या आजारात वाढ झाली असून, त्यांना उपचारांसाठी आता रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने वयोवृद्ध रुग्णांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळानंतर सर्वोपचार रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांची संख्या वाढली आहे. शिवाय बंद करण्यात आलेले काही वॉर्ड सुरू करण्यात आले. रुग्णांनी कुठलाही आजार अंगावर काढू नये. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेवूनच औषधोपचार घ्यावा. सर्वोपचार रुग्णालयातील नॉनकोविड रुग्णसेवा सुरू झाली आहे.
- डॉ. मुुकुंद अष्टपुत्रे, विभागप्रमुख, मेडिसीन, जीएमसी