रुग्णसंख्या घसरली; व्यापारी म्हणतात वेळ वाढवून द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:41+5:302021-07-14T04:21:41+5:30
संसर्गजन्य काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या उद्देशातून लावलेल्या निर्बंधामुळे अनेक लहान-माेठे उद्याेग देशाेधडीला लागले. अनेकांच्या नाेकऱ्या गेल्याने आर्थिक संकट ...
संसर्गजन्य काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या उद्देशातून लावलेल्या निर्बंधामुळे अनेक लहान-माेठे उद्याेग देशाेधडीला लागले. अनेकांच्या नाेकऱ्या गेल्याने आर्थिक संकट ओढावले. हातावर पाेट असणाऱ्या वर्गावर उपासमारीची पाळी आली. जुलै, २०२० नंतर या परिस्थितीत सुधारणा हाेण्याची चिन्हं दिसू लागल्याने केंद्र व राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने उद्याेग, व्यापार सुरू करण्याची परवानगी दिली. या दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा व्यापार, उद्याेगाचे चक्र विस्कळीत झाले. ही परिस्थिती आजपर्यंत कायम आहे. मे महिन्याच्या अखेरपासून काेराेनाचा आलेख कमी हाेत असल्याचे निदर्शनास आल्याने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्याचे निर्देश दिले. बाजारपेठेचा कालावधी कमी असल्याने साहित्य खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत काेराेना रुग्णांची संख्या नगण्य झाल्याची बाब अकाेलेकरांसाठी दिलासादायक ठरली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता, जिल्हा प्रशासनाने बाजारपेठ सुरू ठेवण्याचा कालावधी वाढवून दिल्यास गर्दीवरही आपसूकच नियंत्रण येणे शक्य हाेणार आहे, शिवाय उद्याेग व्यवसायाची गाडी रुळावर येण्यास माेठी मदत हाेणार आहे.
सकाळी ७ वाजताची वेळ अयाेग्य
जिल्हा प्रशासनाने बाजारपेठ खुली करण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंतची वेळ निश्चित केली आहे. मिनी बायपास मार्गावरील हाेलसेल किराणा मार्केटमध्ये राज्यभरातून जीवनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण केली जाते. सकाळी ७ वाजताची वेळ व्यापाऱ्यांसाठी, तसेच ग्राहकांसाठी कुचकामी ठरत आहे.
बाजारपेठेचा अवधी सायंकाळी ७ पर्यंत वाढवून द्यावा, तसेच शनिवार व रविवार असे दाेन दिवस बाजारपेठ बंद न ठेवता, केवळ रविवारी बंद ठेवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
- नितीन खंडेलवाल अध्यक्ष, विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स
सकाळी ७ वाजता जिल्ह्याबाहेरील व्यापारी शहरात दाखल हाेऊ शकत नाहीत, तसेच सायंकाळी ४ पर्यंतच्या मुदतीत संपूर्ण दिवस भराचा हिशेब व लेखाजाेखा मांडता येत नाही. त्यामुळे व्यापारासाठी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंतची परवानगी द्यावी.
- कासीम अली नानजी भाई सचिव, हाेलसेल किराणा मर्चंट असाेसिएशन