ज्ञानरचनावाद अवलंबणाऱ्या शाळांची संख्या घटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:51 PM2018-06-03T13:51:41+5:302018-06-03T13:51:41+5:30
अकोला: राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती अवलंबणाºया शाळांची संख्या वाढत असताना, अकोला जिल्ह्यात मात्र विरुद्ध परिस्थिती आहे. दरवर्षी ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती शाळांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न होत असताना, अकोला जिल्ह्यात केवळ ५७ शाळांमध्येच या शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येत आहेत.
- नितीन गव्हाळे
अकोला: राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती अवलंबणाºया शाळांची संख्या वाढत असताना, अकोला जिल्ह्यात मात्र विरुद्ध परिस्थिती आहे. दरवर्षी ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती शाळांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न होत असताना, अकोला जिल्ह्यात केवळ ५७ शाळांमध्येच या शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येत आहेत. ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीचा वापर करण्याकडे अनेक शाळा कानाडोळा करीत आहेत.
केंद्र शासनाने २00५ मध्ये ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती लागू केली. प्राथमिक शाळांतील पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांना ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन करण्यात यावे. पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांवर मानसिक आणि शारीरिक ताण आहे. त्यामुळे राज्यभर पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्यापन करण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना प्रभावीपणे ज्ञानाचे धडे देता येणार आहेत. विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण दिले जावे. त्यासाठी शाळांतील भिंती विविध रंगांनी रंगवून बोलक्या कराव्यात. त्या खोलीतील सर्व फरशीवर रंगकाम करून अक्षरओळख करून द्यावी. पाढे, गाणी यांचे कृतियुक्त अध्ययन व्हावे. हा यामागचा उद्देश. केंद्र शासनाने सर्वच राज्यांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांनी ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीचा वापर करण्याचे निर्देश दिले खरे; परंतु अकोला जिल्ह्यात मोजक्याच शाळांनी या पद्धतीचा अवलंब केला. जिल्ह्यात साडेचार हजारावर प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यात केवळ ५४ शाळांमध्ये ज्ञानरचनावाद पद्धतीने शिकविल्या जाते. यातही या शाळांची संख्या घटत आहे. ही संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाकडूनही प्रयत्न होताना दिसत नाहीत.
शाळांनी ज्ञानरचनावादाचा शिक्षणात समावेश करावा. यासाठी शिक्षण विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु काही शाळा त्याकडे दुर्लक्ष करतात. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून जास्तीत जास्त शाळांनी ज्ञानरचनावादाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जि.प. अकोला.