ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:20 AM2021-02-11T04:20:38+5:302021-02-11T04:20:38+5:30
बोरगाव मंजू : गत मार्च महिन्यापासून कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शासनाने लॉकडाऊन घोषित ...
बोरगाव मंजू : गत मार्च महिन्यापासून कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शासनाने लॉकडाऊन घोषित केले. या लाॅकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद केले होते. सध्या अनलॉक प्रक्रियेत पाचवी ते बारावीपर्यंत शाळा पुन्हा सुरू झाल्या आहे. बोरगाव मंजू परिसरातील शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन वर्ग सुरू केले होते. ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थ्यांनी अध्ययन केले. ज्या पालक, विद्यार्थ्यांकडे मोबाइल उपलब्ध नाहीत तसेच नेटवर्क प्राब्लेम आहे, अशा ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विविध उपक्रम राबविले होते. गत नोव्हेंबरपासून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेत शाळा सुरू केल्या. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस कोरोनाची धास्ती असल्याने विद्यार्थिसंख्या घटली होती; मात्र सद्य:स्थितीत शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थ्यांची किलबिल सुरू असून, विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागल्याचे चित्र दिसून येत आहे. (फोटो)