पटसंख्या घसरल्याने १०० शिक्षकांची पदे घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:35 PM2019-03-10T12:35:20+5:302019-03-10T12:35:26+5:30
अकोला: ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या घसरल्याने जिल्ह्यातील एकूण शिक्षकांच्या पदसंख्येपैकी १०० पदे घटल्याची माहिती आहे.
अकोला: ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या घसरल्याने जिल्ह्यातील एकूण शिक्षकांच्या पदसंख्येपैकी १०० पदे घटल्याची माहिती आहे. त्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांतील मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षकांच्या पदांचा समावेश आहे. येत्या सत्रात अतिरिक्त आणि रिक्त पदांच्या तुलनेत समायोजन करावे लागणार आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांवर कॉन्व्हेंट संस्कृतीने अतिक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कॉन्व्हेंटकडे वळत आहेत. शहरालगतच्या गावांतील विद्यार्थी सर्रासपणे शहरातील शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या मराठी, उर्दू माध्यमांच्या शाळांना बसत आहे.
दरवर्षी शाळांची पटपडताळणी ३० सप्टेंबर रोजी केली जाते. त्या दिवशी शाळेतील एकूण प्रवेशित विद्यार्थी संख्येनुसार त्या शाळेसह जिल्हाभरात शिक्षकांची संख्या निश्चित केली जाते. चालू वर्षात केलेल्या पटपडताळणीत जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या बरीच घटली आहे. कमी झालेल्या पटसंख्येनुसार त्या-त्या शाळांवर शिक्षकांची निश्चिती करावी लागणार आहे. तसेच संपूर्ण जिल्हास्तरावर एकूण कमी झालेल्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची १०० पदे कमी होणार आहेत. त्यासाठी शिक्षकांच्या एकूण पदासोबत कमी झालेली पदे, रिक्त असलेल्या, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या जागांवर समायोजित करावी लागणार आहेत. ती प्रक्रिया येत्या सत्रातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतून केली जाणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी संख्या घटल्याने काही शाळा बंद पडण्याच्या स्थितीतही आल्याची माहिती आहे. त्याबद्दलचा विचारही शिक्षण विभागाला करावा लागणार आहे.
- डिजिटल शाळांचा घोटला गळा
विशेष म्हणजे, शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या धोरणाने डिजिटल शाळा निर्मितीचा गळा घोटला. अनेक मुख्याध्यापक शिक्षकांनी पुढाकार घेत लोकसहभागातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डिजिटल शाळांची संख्या वाढवली. त्याचवेळी आॅनलाइन बदली प्रक्रियेने शिक्षकांना त्या गावात राहण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे शिक्षकांनी हात आवरता घेत शाळा डिजिटल करण्याच्या मुद्यांकडे दुर्लक्ष केले. काही गावांमध्ये शाळांचा दर्जा सुधारल्याने कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्याचीही उदाहरणेही आहेत.
- रिक्त, अतिरिक्त पदांची तुलना
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २०१७-१८ च्या संचमान्यतेनुसार मराठी माध्यमात मुख्याध्यापकांची १२४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११० पदे कार्यरत आहेत. सहायक शिक्षकांची २७०७ कार्यरत आहेत. प्रत्यक्षात संचमान्यतेनुसार २२०१ पदांनाच मंजूरी आहे. पदवीधर शिक्षकांची मंजूर ६८० पैकी २०९ कार्यरत आहेत. उर्दू माध्यमात मुख्याध्यापकांची १६ पदे रिक्त, सहायक शिक्षकांची ७९ अतिरिक्त तर पदवीधर शिक्षकांची ११० पदे रिक्त आहेत. पटपडताळणीच्या तुलनेत किमान शंभर पदे कमी होणार असून, तेही अतिरिक्त ठरणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांची समस्या जिल्हा परिषदेची डोकेदुखी ठरणार आहे.
शाळांच्या पटपडताळणीचा अहवाल आला आहे. त्यानुसार येत्या काळात उपाययोजना केल्या जातील.
- वैशाली ठग, शिक्षणाधिकारी, प्राथमिक