रेल्वेची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:20 AM2021-07-30T04:20:05+5:302021-07-30T04:20:05+5:30
अकोला : कोरोनाकाळात ठप्प असलेली रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्ववत होत असून, रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या सुुरू करण्यात आल्या आहेत. ...
अकोला : कोरोनाकाळात ठप्प असलेली रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्ववत होत असून, रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या सुुरू करण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचे पालन करून सुरू असलेल्या या गाड्यांची संख्या वाढत असली, तरी या गाड्यांना छोट्या स्थानकांवर थांबे नसल्याने पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुंबई-कोलकाता हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग जिल्ह्यातून जातो. या मार्गावर मध्य रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. जंक्शन स्टेशन असलेल्या अकोला येथे या मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांना थांबा आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची सोय झाली आहे. तथापी, जिल्ह्यातील मूर्तिजापूर या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या स्थानकावर अजूनही सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात आला नाही. या ठिकाणी केवळ चार गाड्यांना थांबा आहे. मॉडेल स्टेशनचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरही याठिकाणी सुपरफास्ट गाड्यांना थांबा नसल्याने येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या लोहमार्गावर पारस, गायगाव, कुरणखेड, बोरगाव मंजू, कुरुम सारख्या छोट्या स्थानकांवर पॅसेंजर गाड्यांना थांबा होता. परंतु, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने छोट्या स्थानकावर अवलंबून असलेल्या नागरिकांना थेट अकोला गाठावे लागत आहे.
सध्या सुरु असलेल्या गाड्या
मुंबई-हावडा
अहमदाबाद-हावडा
अमरावती - मुंबई
गोंदिया - मुंबई
कोल्हापूर - गोंदिया
हापा - बिलासपूर
एलटीटी - भुवनेश्वर
मूर्तिजापूर हे महत्त्वाचे स्टेशन असून, मॉडेल स्टेशनचा दर्जा प्राप्त झाला आहे. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची संख्याही जास्त असते. त्यामुळे येथून जाणाऱ्या सर्वच गाड्यांना थांबा देण्यात यावा.
-सतीश शर्मा, डीआरयूसीसी सदस्य, मूर्तिजापूर
पूर्वी पॅसेंजर गाड्या सुरु असल्याने आमच्या स्टेशनवर या गाड्यांना थांबा होता. अकोला येथे जाण्यासाठी पॅसेंजर गाड्या सोयीच्या होत्या. आता आमच्या स्टेशनवर कोणतीही गाडी थांबत नाही. पॅसेंजर गाड्या सुरु करण्यात याव्या.
- शिवशंकर श्रीकृष्ण कडू, ग्रा.पं. सदस्य, पारस