Nurse Day Special : रक्ताचं नातं नसलं, तरी रुग्णांना मानसिक आधार त्यांचाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:06 AM2020-05-12T10:06:30+5:302020-05-12T10:06:43+5:30
जिवाभावाच्या ‘सिस्टर’ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त सलाम !
प्रवीण खेते
अकोला : माणूस अंथरूणाला खिळला, एखादा आजार जडला की रक्ताचे नातेही सैल होते. आपलीच माणसे दुरावतात. अशावेळी रक्ताचे कुठलेही नाते नसताना आणि कोणतेही नात्याचे संबंध नसताना रुग्णालयात आपलं म्हणून साथ देते. औषध देते, मानसिक आधारही तीच देते. काही सांगावेसे वाटले तर ऐकणारीदेखील तीच असते. अशा या जिवाभावाच्या ‘सिस्टर’ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त सलाम !
‘मम्मी बाहेर कोलोना आहे! तू जाऊ नाई! तू लोकांना गोल्या, औषधी देते, तेवा मास्क वापरत जा, सॅनिटायझर हाताला लावत जा. तू लवकर घरी ये. मला करमत नाही.’ होय, हा बोबडा हट्ट आहे सर्वोपचार रुग्णालयात अधिसेविका असणाऱ्या सूचिता सुधाकर टेमधरे यांच्या तीन वर्षीय चिमुकली इशिताचा. कोरोनामुळे आईने स्वत:ला क्वारंटीन केल्याने गत महिनाभरापासून या मायलेकीची भेट झाली नाही. दोनदा भेट झाली, तीही दुरूनच! कोरोनाने आम्हा दोघी मायलेकींना कणखर बनवल्याचे, सूचिता यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अशा शेकडो सूचिता आज स्वत:च्या कुटुंबीयांपासून दूर राहून कोरोनाविरुद्धचा लढा लढत आहेत. गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना विरोधातील लढाई सुरू असल्याने रुग्णसेवेसाठी परिचारिकांना सदैव तत्पर राहावे लागत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील अधिपरिचारिका व इतर परिचारिका कुटुंबीयांसोबत न राहत घरापासून लांब वसतिगृहात राहत आहेत. एरवी या परिचारिकांशिवाय न राहणाºया त्यांच्या चिमुकल्यांना वा कुटुंबीयांना गत महिनाभरापासून त्यांना वेळ देता येत नाही. मात्र सद्यस्थितीत कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शहरातील स्थिती पाहता रुग्णसेवेसाठी काम करणाºया हातांची गरज आहे. त्यामुळे कुटुंबापासून, मुलांपासून दीर्घकाळ घराबाहेर राहणे, येणाºया प्रत्येक आव्हानाला सक्षमपणे तोंड देणे, तडजोड करणे, स्वत:ची आणि इतरांच्या सुरक्षेसाठी कायम सतर्क आणि तत्पर राहणे, अशा अनेक बाबी कोरोनाने शिकविल्याचेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका सांगतात.
चिमुकल्यांमध्ये जीव अडकतो; पण.....
गत महिनभरात या परिचारिकांनी केवळ एक-दोनदा घरी जाऊन कुटुंबीयांना भेट दिली, तीही दुरूनच! तर काही परिचारिका घरी राहत असल्या तरी त्यांना चिमुकल्यांची तासभर समजूत काढून, तºहेतºहेचे आमिष दाखवून घराबाहेर पडावे लागते; मात्र घरातून बाहेर पडल्यानंतर ड्युटीवर पोहोचेपर्यंत चिमुकल्यांचा चेहरा नजरेसमोरून हटत नाही. मुलांशी आपली नाळ घट्ट जुळलेली असते. काहीही केल्या त्यांच्यातून मन निघत नाही;
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सलग रुग्णसेवा सुरू असल्याने कुटुंबात न मिसळता मी स्वत:ला क्वारंटीन केले आहे. त्यामुळे गेल्या ९ एप्रिलपासून मी वसतिगृहात राहत आहे. त्यामुळे मुलीची भेटही होत नाही. घरी माझ्याशिवाय तिला एक मिनिट चैन पडत नाही; पण सध्याच्या या संकटात रुग्णसेवाही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे सध्या तिचे बाबाच तिची आईच्या भूमिकेतून काळजी घेतात.
- सूचिता टेमधरे, अधिपरिचारिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
सर्वच परिचारिका त्यांच्या कर्तव्यात ग्रेट आहेत आणि राहणार यात शंकाच नाही; मात्र रुग्णसेवा करताना स्वत:ची काळजी घ्या, तुमच्याबरोबर तुमच्या परिवाराचीदेखील काळजी घ्या, तुम्ही समाजाबरोबर कुटुंबाचादेखील आधार आहात. ‘नो वर्क नो मिस्टेक’ हा आपला धर्म नाही, आपण सेवा देतो, रुग्ण बरा होऊन घरी जातो. यासारखे दुसरे कुठलेही समाधान नाही कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकणार आहोतच, हीच आपली सर्वांची अग्निपरीक्षा आहे
- प्रियंका जाधव, सह.अधिसेविका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय