चुकीचे इंजेक्शन दिल्याप्रकरणी परिचारिका दोषी!
By admin | Published: October 27, 2016 03:33 AM2016-10-27T03:33:37+5:302016-10-27T03:33:37+5:30
चौकशी समितीच्या अहवालात परिचारिकेवर ठपका!
अकोला, दि. २६- सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मधील तापाच्या आजाराने त्रस्त रुग्णाला विष प्राशन केलेला रुग्ण समजून चुकीचे इंजेक्शन दिल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी घडली होती. अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी नियुक्ती केलेल्या चार सदस्यीय समितीच्या चौकशीमध्ये सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिका दोषी आढळून आली आहे. परिचारिकेच्या निष्काळजीमुळे तापाच्या रुग्णाला विष प्राशन केलेला रुग्ण समजून इंजेक्शन लावण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे परिचारिकेची वेतनवाढ आणि पदोन्नतीवर गदा येणार आहे.
सर्वोपचार रुग्णालयात वार्ड क्रमांक ६ मध्ये भरती झालेले ज्ञानदेव काशीराम बोदडे या विष प्राशन केलेल्या रुग्णाऐवजी तापाचा रुग्ण सय्यद जमीर याला इंजेक्शन लावले. एवढेच नाही, तर त्याला सलाईनसुद्धा लावली. यामुळे युवकाची प्रकृती बिघडली होती. चुकीचे इंजेक्शन लावल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी चार सदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीने वार्ड क्रमांक ६ मधील तैनात आरोग्य कर्मचारी, परिचारिकांची चौकशी केली.
चौकशीदरम्यान परिचारिका ज्योती आडे यांनी चुकीचे इंजेक्शन लावल्याची बाब समोर आली. त्यामुळे चौकशी समितीने आडे यांच्या सेवा पुस्तक आणि सीआर(गुप्त अहवाल) मध्ये निष्काळजी केल्याचा शेरा मारला. त्यामुळे परिचारिकेला पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. परिचारिकेवरील कारवाईमुळे सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, परिचारिकांमध्ये खळबळ उडाली आहे.