परिचारिकांनी पुकारले दोन दिवसीय राज्यव्यापी कामबंद आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:22+5:302021-06-24T04:14:22+5:30

विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ ते २५ जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे आंदोलन पुकारण्यात आले आहे. संघटनेच्या अकोला ...

Nurses call for two-day statewide strike | परिचारिकांनी पुकारले दोन दिवसीय राज्यव्यापी कामबंद आंदोलन!

परिचारिकांनी पुकारले दोन दिवसीय राज्यव्यापी कामबंद आंदोलन!

Next

विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ ते २५ जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे आंदोलन पुकारण्यात आले आहे. संघटनेच्या अकोला शाखेतर्फे बुध‌वारी (दि. २३) सर्वोपचार रुग्णालय परिसरात निदर्शने करण्यात आली. यापूर्वी २१ व २२ जून रोजी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे राज्यभरात दोन तासांचे कामबंद आंदाेलन केले होते; मात्र शासनातर्फे कुठलेही सकारात्मक उत्तर न मिळाल्याने आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. त्यामुळे २३ आणि २४ जूनदरम्यान राज्यभरातील परिचारिका पूर्णवेळ कामबंद ठेवणार आहेत. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे. या दोन दिवसातही प्रशासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास २५ जूनपासून राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलनाला प्रारंभ करण्याचा इशाराही यावेळी परिचारिकांनी दिला. आंदोलनात अध्यक्ष वंदना डामरे, सरचिटणीस सतीश कुरटवाड, उपाध्यक्ष प्रकाश नवरखेडे, सहसरचिटणीस सुमेध वानखडे, कोषाध्यक्ष मनोज चोपडे, सहकोषाध्यक्ष जया खांबलकर, संघटक स्वप्निल लामतुरे, प्रमोद चिंचे, सदस्य सुनीता उगले, लता गोहत्रे, संध्या उमाळे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.

..या आहेत मागण्या

कोविडकाळात सात दिवस कर्तव्यकाळ व तीन दिवस अलगीकरण रजा कायम ठेवा. बंद केलेली साप्ताहिक सुटी द्या.

केंद्र शासनाप्रमाणे परिचारिकांच्या पदनामात बदल करावा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शासनमान्यता प्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला जातो, तो थांबवावा.

कोरोनाबाधित झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेला कालावधी व विश्रांतीचा कालावधी गैरहजेरी किंवा वैद्यकीय रजा न पकडता, कोविड विशेष रजा पकडून विलंब वेतन अदा करावे.

परिचारिकांना फक्त रुग्णसेवेची कामे द्यावी, मृत परिचारिकांच्या कुटुंबीयांना विनाविलंब ५० लाख विमा व इतर सर्व देय आर्थिक लाभ द्यावे.

मृत परिचारिकांच्या कुटुंबीयांना शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने नोकरी द्यावी.

रुग्णसेवा प्रभावित; कंत्राटींवर जीएमसीचा भार

परिचारिकांनी राज्यव्यापी पुकारलेल्या आंदोलनामुळे अकोल्यासह राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील सुमारे ३० ते ४० टक्के रुग्णसेवा प्रभावित झाल्याची माहिती आहे. येथील रुग्णसेवेचा भार हा कंत्राटी परिचारिकांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याचीही माहिती आहे.

अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही रुग्णसेवा काही प्रमाणात प्रभावित झाली आहे, मात्र सर्जरीसह इतर महत्त्वाचे वाॅर्ड सुरळीत सुरू आहेत.

- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

Web Title: Nurses call for two-day statewide strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.