नुटा, विज्युक्टाची युती झाल्यास इच्छुक उमेदवारांना निवडणूक जाणार जड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:24 PM2019-12-01T12:24:28+5:302019-12-01T12:24:42+5:30
यंदाच्या निवडणुकीमध्ये शिक्षण क्षेत्रात दबदबा असणारी नुटा व विज्युक्टाची युती होण्याची शक्यता आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिक्षक मतदार नोंदणीची प्रक्रिया झाली आहे. आता शिक्षक संघटनांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, शिक्षक मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये शिक्षण क्षेत्रात दबदबा असणारी नुटा व विज्युक्टाची युती होण्याची शक्यता आहे. यंदा ही युती झाली तर इतर संघटनांच्या इच्छुक उमेदवारांना शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जड जाणार आहे.
सध्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासोबतच शिक्षक मतदारांसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यंदाच्या निवडणुकीत सर्वच शिक्षक संघटना ताकदीने उतरणार आहेत. या मतदारसंघासाठी शिक्षक संघटना, शिक्षक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही शिक्षक संघटना मतदारसंघ आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी करीत आहेत; परंतु या मतदारसंघामध्ये माजी आमदार बी. टी. देशमुख यांची नुटा ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहील, त्या उमेदवाराचे पारडे जड मानल्या जाते. यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये नुटा, विज्युक्टा आणि विमाशिसं या संघटनांमध्ये युती होती. त्यामुळे लागोपाठ दहा वर्षे वसंतराव खोटरे या मतदारसंघाचे आमदार होते; परंतु तिसऱ्या निवडणुकीत या संघटनांमध्ये फूट पडली. त्यामुळे त्याचा लाभ शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना मिळाला. यंदा मात्र चित्र वेगळे राहू शकते. माजी आमदार बी. टी. देशमुख यांची नुटा आणि खोटरे यांची पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना आणि विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशनमध्ये युती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. या तीन संघटना एकत्र आल्या तर त्यांच्या उमेदवाराला निवडून येणे फार कठीण नसल्याचे बोलले जाते. कारण शिक्षण क्षेत्रात बी. टी. देशमुख हे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा शब्द प्रमाण आहे. यंदा विज्युक्टाकडून प्रा. डॉ. अविनाश बोर्डे शिक्षक मतदारसंघाकडून नशीब अजामवणार आहेत. त्यांना नुटा, विमाशिसंचा पाठिंबा मिळाला तर इतर इच्छुकांसमोर अडचण निर्माण होऊ शकते. यासोबतच शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, संगीता शिंदे, रमेश चांदुरकर, वाशिमचे किरण सरनाईक, राजकुमार बोनकिले हेसुद्धा तयारी करीत आहेत. इच्छुक उमेदवारसुद्धा बी. टी. देशमुख यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नुटा, विज्युक्टा व खोटरे यांची विमाशिसंची युती होईल की नाही, हा कळीचा मुद्दा आहे; परंतु ही युती झाली तर यंदाची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक निश्चितच सोपी राहणार नाही.
भाजप शिक्षक सेलमुळेही रंगत!
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा भाजप शिक्षक सेलसुद्धा ताकदीने मैदानात उतरला आहे. भाजप शिक्षक सेलची मोट बांधणारे नितीन खर्चे यांनी शिक्षक मतदार नोंदणीसोबत शिक्षक संपर्कावर भर दिला आहे. भाजप शिक्षक सेल मैदानात उतरल्यामुळे शिक्षक मतदारसंघात चांगलीच रंगत पाहावयास मिळणार आहे.