दिवाळीपासून पोषण आहार गायब
By admin | Published: December 31, 2015 02:36 AM2015-12-31T02:36:22+5:302015-12-31T02:36:22+5:30
खामगाव उपविभातील प्रकार; अंगणवाडीतील चिमुकले केळी व अंडीपासून वंचित.
खामगाव: अंगणवाडीमध्ये केळी व अंडी यांचे वाटप दिवाळीपासून बंद झाले आहे. त्यासाठी निधी नसल्याचे कारण देण्यात येत आहे. पुरेसा पोषण आहार न मिळाल्याने कुपोषित बालकांचे प्रमाण गेल्या काही वर्षांंमध्ये वाढत होते. शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली होती. कुपोषणाचे हे वाढते प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासनाने अंगणवाडीत बालकांना पोषण आहार सुरू केला, तर या आहाराला पूरक पोषण आहार म्हणून केळी व अंडी वाटप करण्यास सुरुवात केली होती; मात्र दिवाळीपासून अंगणवाडीमध्ये केळी व अंडी वाटप बंद झाले आहे. याबाबत विचारणा करण्यात आली असता, निधी नसल्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. आज ना उद्या वाटप सुरू होईल, या प्रतीक्षेत दोन-तीन महिने उलटले आहेत. सन २0१६ सुरू होत असतानाही पूरक आहार वाटपाची काहीच चिन्हे नाहीत. निधी आता आला तरी बालक तीन महिन्यांपासून या आहारापासून मात्र वंचित राहिले आहेत.