नायलॉन मांजावरील बंदी कागदावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 02:14 PM2020-01-13T14:14:18+5:302020-01-13T14:14:27+5:30
मांजामुळे नागरिकांसह पक्षांचाही जीव धोक्यात आला असून, विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.
अकोला: बंदी असतानाही बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू असल्याने या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे. या मांजामुळे नागरिकांसह पक्षांचाही जीव धोक्यात आला असून, विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.
येत्या दोन दिवसांत मकर संक्रांत असल्याने बाजारपेठेत मांजा व पतंग खरेदीसाठी गर्दी झाली आहे; मात्र पतंगप्रेमींमध्ये चिनी व नायलॉन मांजाची क्रेझ दिसून येत आहे. गतवर्षी या मांजामुळे अनेक अपघात झाल्यानंतरही यंदा या मांजाची मागणी होत आहे; परंतु हा मांजा नागरिकांसह पशू-पक्ष्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. नागरिकांना चालताना किंवा वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडतात. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार, राज्य सरकारने १९८६ पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. दरवर्षी याबाबत विविध संस्था संघटनांकडून जनजागृती केली जाते; मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने बाजारपेठेत नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे.
प्लास्टिक पतंगचीही मोठी उलाढाल
नायलॉन मांजासोबतच प्लास्टिकच्या पतंगांचीही मोठी उलाढाल सुरू आहे. राज्यात प्लास्टिकला बंदी असतानाही प्लास्टिकपासून निर्मित पतंगांची धडाक्यात विक्री सुरू आहे. नायलॉन मांजासह प्लास्टिक च्या पतंग झाडात किंवा वीज वाहिनीत अडकल्याने पक्ष्यांसाठी घातक ठरत आहेत.