व-हाडातील आंबा बहरलाच नाही!
By Admin | Published: April 9, 2016 01:35 AM2016-04-09T01:35:44+5:302016-04-09T01:35:44+5:30
अत्यल्प पावसाचा फटका; संकरीत आंब्यावर यंदाची ‘रसाई’
ब्रम्हानंद जाधव / मेहकर (जि.बुलडाणा)
अत्यल्प पावसामुळे फळांचा राजा आंब्याच्या मुळाशी पाणी पोहचले नसल्याने यावर्षी पश्चिम वर्हाडातील गावरान आंबा बहरलाच नाही. त्यामुळे वर्हाडवासीयांना परप्रांतातून येणार्या संकरीत आंब्यावर यंदाची रसाई करावी लागणार आहे.
पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यात बहुतांश शेतीच्या बांधावर गावरान आंबा बहरताना दिसतो. गावरान आंब्याचे झाड वर्षाकाठी १0 ते १५ हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न सहज देऊन जाते. पायरी जातीच्या आंबा पिकासाठी पश्चिम वर्हाडातील वातावरण पोषक आहे. पायरीला १४ फेब्रुवारीनंतर मोठय़ा प्रमाणात मोहर येतो; यावेळी मात्र नेमका बहर लागण्याच्या मोसमात अवकाळी पावसासह गारपीटीचा फटका बसल्याने जेमतेम लागलेला मोहरही गळून गेला. परिणामी आता कोकणातून येणार्या केसर, दशहरी, लंगडा, नीलम आदिसारख्या संकरीत आंब्याच्या रसावरच वर्हाडवासीयांना अवलंबून राहावे लागणार आहे.
वादळी वार्यासह अवकाळी पावसाने विदर्भातील आंब्याचा फुलोरा पुर्णपणे झडला असल्यामुळे या हंगामात आंब्याचे भावही वाढण्याची शक्यता आहे.
शंभर ते दीडशे रुपये दर!
गुढीपाडव्यापासून गावरान आंबा बाजारात येतो; मात्र यंदा गावरान आंब्याला अत्यल्प पावसाचा फटका बसल्याने बाजारात केवळ संकरीत आंबे आले आहेत. साधारणत: १00 ते १५0 रुपये किलो असा दर सध्या आहे.