ऐ मौत तूने मुझे जमींदार कर दिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:30 AM2020-08-12T10:30:32+5:302020-08-12T10:30:54+5:30

डॉ. महेबुब राही यांच्या ‘चाँदणी तखय्युल की’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राहत इंदौरी बार्शीटाकळी येथे आले होते

O death, you have made me a landlord - Rahat Indori | ऐ मौत तूने मुझे जमींदार कर दिया!

ऐ मौत तूने मुझे जमींदार कर दिया!

Next

अकोला : दो गज सही
मगर यह मेरी मिल्कियत तो है
ऐ मौत तूने
मुझे जमींदार कर दिया....अशा एकापेक्षा एक सरस शेर असलेल्या अनेक गझल सादर करून मैफिली जिंकणारे जिंदादिली शायर डॉ. राहत इंदौरी यांचा पश्चिम वºहाडातील निवडक शायरांसोबत चांगलाच ऋणानुबंध होता. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे सायंकाळी झालेल्या कवी संमेलनात राहत इंदौरी यांनी रंगत आणली होती.
अकोल्याच्या बार्शीटाकळी येथील डॉ. मेहबुब राही हे त्यांचे एक स्नेही. डॉ. राही यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ. महेबुब राही यांच्या ‘चाँदणी तखय्युल की’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राहत इंदौरी बार्शीटाकळी येथे आले होते. डॉ. राही म्हणाले की, राहत इंदौरी हे भारतातील मोठे शायर. देश-विदेशात त्यांचे कार्यक्रम होतात. त्यामुळे त्यांचे मानधनही जास्तच असे. त्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले अन् मानधनाचा विषय आल्यावर त्यांनी कुठल्याही रकमेचा आग्रह न धरता केवळ माझ्यावरील प्रेमापोटी ते बार्शीटाकळीत आले.
एवढा मोठा शायर; पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही मोठेपणाचा लवलेश नव्हता. शेर सादर करण्याची त्यांची वेगळी शैली हे त्यांचे खास वैशिष्ट्य, शेरची पहिली ओळ ते उंचावर नेत अन् दुसऱ्या ओळीमध्ये वेगळी कलाटणी घेऊन त्यांनी शब्द फेकले की मैफील एका वेगळ्या उंचीवर जात असे. देशातील अनेक प्रश्नांवरही त्यांची भूमिका रोखठोक असे.
आजच्या घडीला मुनव्वर राणा अन् राहत इंदौरी या दोन शायरांनी संपूर्ण देशाात कमावलेली लोकप्रियता ही त्यांच्या लेखणीची ताकद आहे. राहत इंदौरी यांनी जातीवादावर प्रहार करणारेही लिखाण केले. त्यांचा एक शेर खूपच प्रसिद्ध आहे
हमारा खुन भी सामील है
इसीकी मिट्टी में,
किसी के बाप का हिंदोस्ता थोडी है.....अशी प्रखर भूमिका ते घेत
मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना,
लहू से मेरी पैशानी पे हिन्दुस्तान लिख देना...असे म्हणणारा शायर आपल्या साहित्याने अजरामर राहील, अशा शब्दात डॉ. राही यांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या.


राहत इंदौरी यांच्या समवेत १९७५ मध्ये मला कविता सादर करण्याचा योग आला अन् त्यानंतर अनेकवेळा कवी संमेलनात सोबतच सहभागी झालो. राहत इंदौरी हे ‘अदब’ आणि ‘तहजीब’चे कवी होते. त्याचा आत्मविश्वास त्यांना एका उच्च स्थानावर घेऊन गेला, त्यांच्या कविता उर्दू-हिंदी गझलच्या जगावर नेहमीच वर्चस्व कायम ठेवतील.
-घनश्याम अग्रवाल, ज्येष्ठ कवी


इंदौरी यांना कलाश्रयाच्या मैफलीत ऐकण्याची संधी मिळाली. ती संध्याकाळ अजूनही डोळ्यासमोर तरंगते. त्यांच्या कवितेतुन राजकीय प्रासंगिकता, तसेच त्यांच्या शायरीमध्ये सर्वसामान्यांच्या भावना जुळवून घेण्याची क्षमता आहे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
-डॉ. रामप्रकाश वर्मा,
साहित्यिक, अकोला


राहत इंदौरी यांची स्टाईल खूप वेगळी होती. कलाश्रय माध्यमातून त्यांना अकोल्यात बोलवण्याची संधी मिळाली. कवि संमेलनाची ती संध्याकाळ अकोल्याच्या साहित्यप्रेमींसाठी अजूनही संस्मरणीय आहे. मंचावर बरेच कवी होते पण राहतजी यांची शायरी सादर करण्याची शैली सर्वांचे मन जिंकणारी ठरली. त्यांच्या जाण्याने हिंदी-उर्दू साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
-डॉ. राजीव बियाणी, ज्येष्ठ पत्रकार

 

Web Title: O death, you have made me a landlord - Rahat Indori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.