भाजपमुळे ‘ओबीसीं’चे हक्क धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2017 02:00 AM2017-06-02T02:00:51+5:302017-06-02T02:00:51+5:30
ओबीसी युवक मेळावा : प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: भाजपा-रा.स्व. संघाला सत्ता चालवायची नाही तर गाजवायची असून, सर्वसामान्यांना गुलाम करायचे आहे, भाजप-संघाचे सरकार देशातील ‘ओबीसीं’ना काही देत नाही; मात्र जे न्याय-हक्क मिळाले ते काढून घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला.
येथील आबासाहेब खेडकर सभागृहाच्या प्रांगणात भारिप-बमसंच्यावतीने आयोजित ओबीसी युवक मेळाव्यात ते बोलत होते. अॅड. आंबेडकर म्हणाले की, रा.स्व. संघ-भाजपाला संतांची परंपरा मोडीत काढायची आहे.
त्यासाठी मनुवादी व्यवस्थेचा प्रचार करण्यात येत आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताही कळवळा नसल्याचा आरोप करीत सरसकट नाही तर किमान दहा एकराआतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विद्यमान सरकार सर्वसामान्य आणि शेतकरी हिताचे नसून, व्यापाऱ्यांच्या हिताचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपा-रा.स्व. संघ देशावरील एक संकट असून, राजकीय पक्ष संपले तर, राजकीय व्यवस्था संपेल आणि राजकीय व्यवस्था संपली तर हुकूमशाही येईल, असा इशारा देत राजकारणातील प्रतिनिधित्व कायम ठेवण्यासाठी २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपा-रा.स्व. संघाची सत्ता येणार नाही, याबाबत ओबीसींसह सर्वांनीच खूणगाठ बांधा, असे आवाहनही अॅड. आंबेडकर यांनी यावेळी केले.
भाषणांना फाटा; ओबीसी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले मनोगत!
ओबीसी युवक मेळाव्यात केवळ अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे या मेळाव्यात नेत्यांच्या भाषणांना फाटा देण्यात आला. प्रमुख मार्गदर्शनापूर्वी नेत्यांऐवजी ओबीसी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये डॉ. चंद्रशेखर वडतकार, अॅड. देवानंद फुसे, नंदकिशेर बोर्डे, संजय पुंडकर, अॅड. संतोष रहाटे, विक्रम जाधव, कैलास खडसान इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.