शाळेच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकला भावना दुखावणारा मजकूर; शिक्षिका निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:16 PM2020-08-08T17:16:09+5:302020-08-08T17:16:27+5:30
प्राचार्य मॅथ्यू यांनी शनिवारी शिक्षिका सुनील जोसेफ हिला तडकाफडकी निलंबित केले.
अकोला : धार्मिक भावना दुखावणारा एक संदेश येथील माउंट कारमेल स्कूलची शिक्षिका सुनीता जोसेफ हिने व्हॉट्स अॅप गृपच्या माध्यमातून इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना टाकला. हा संदेश उपहास करणारा असून, या संदेशामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार पालकांनी प्राचार्य मॅथ्यू करिकल यांच्याकडे केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत, प्राचार्य मॅथ्यू यांनी शनिवारी शिक्षिका सुनीता जोसेफ हिला तडकाफडकी निलंबित केले.
शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी व्हॉट्स अॅपवर शैक्षणिक गृप तयार करण्यात आले आहेत. माउंट कारमेल शाळेच्या शिक्षिका सुनीता जोसेफ हिने शुक्रवारी सायंकाळी इयत्ता सहावीच्या व्हॉट्स अॅपवर धार्मिक भावना दुखावणारे चित्र व तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित केला. पालकांनी हा संदेश वाचल्यावर, त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याची आणि संबंधित शिक्षिकेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार शाळेचे प्राचार्य मॅथ्यू करिकल यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनीही चित्र व मजकूर तपासला. व्हॉट्स अॅपवरील हा मजकूर व चित्र आक्षेपार्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शिक्षिका सुनीता जोसेफ हिला तडकाफडकी निलंबित केले आणि प्राचार्यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली.