२८ दिवसांत १७ कोटींचे उद्दिष्ट!

By admin | Published: March 3, 2016 02:21 AM2016-03-03T02:21:51+5:302016-03-03T02:21:51+5:30

मनपाच्या मालमत्ता कर विभागाची अग्निपरीक्षा.

Objective of 17 crores in 28 days! | २८ दिवसांत १७ कोटींचे उद्दिष्ट!

२८ दिवसांत १७ कोटींचे उद्दिष्ट!

Next

अकोला: अकोलेकरांनी मालमत्ता कर जमा करण्यास हात आखडता घेतल्यामुळे की काय, कर वसुली करताना मनपाच्या मालमत्ता कर विभागाची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. मार्च महिना संपण्यास अवघे २८ दिवस शिल्लक असून, या कालावधीत तब्बल १७ कोटींची कर वसुली करण्यासाठी मनपाला जिवाचे रान करावे लागणार आहे.
अकोलेकरांच्या खिशातून वसूल केल्या जाणार्‍या कराच्या रकमेतून महापालिका प्रशासनाच्या वतीने मूलभूत सुविधांची पूर्तता केली जाते. मनपाकडून मूलभूत सुविधांची पूर्तता होत नसल्याची ओरड करायची आणि टॅक्स जमा करताना नाक मुरडायची, हा प्रकार थांबणे गरजेचे झाले आहे. मनपाच्या मालमत्ता कर विभागाला मार्च २0१६ पर्यंंत शहरवासीयांजवळून ३0 कोटींचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. यामध्ये गतवर्षीच्या आठ कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. कर वसूल न झाल्यास मूलभूत सुविधांवर परिणाम होण्यासोबतच मनपा कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्नदेखील गंभीर होण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थितीची जाणीव असल्यामुळे उपायुक्त सुरेश सोळसे, कर अधीक्षक विजय पारतवार कर वसुलीसाठी जंगजंग पछाडत आहेत. २ मार्चपर्यंंत १३ कोटी रुपयांचा कर वसूल झाला असून, उर्वरित १७ कोटींच्या वसुलीसाठी मनपाकडे अवघ्या २८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रतिदिवस ५0 ते ५५ लाख रुपयांचा कर वसूल करण्याची अग्निपरीक्षा मनपा कर्मचार्‍यांना द्यावी लागणार आहे. त्यानुषंगाने बुधवारी मनपाच्या मुख्य सभागृहात कर वसुली विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

आयुक्तांची करडी नजर
मालमत्ता कर वसुली विभागाच्या कामकाजाकडे आयुक्त अजय लहाने यांची करडी नजर आहे. कर वसूल न झाल्यास कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या समस्येत भर पडणार आहे. त्यामुळे आयुक्तांकडून या विभागाच्या कामाचा सतत आढावा घेतला जात आहे.
मालमत्तांची जप्ती आणि लिलाव
कर जमा न करणार्‍या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत. अशा बड्या करदात्यांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरु केल्याची माहिती आहे.

Web Title: Objective of 17 crores in 28 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.