पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण; आता कारवाईचा सामना करा!
By admin | Published: July 1, 2015 01:39 AM2015-07-01T01:39:31+5:302015-07-01T01:39:31+5:30
५0 टक्केही कर्जवाटप नाही; जिल्हाधिका-यांचा बँकांना इशारा.
अकोला : राज्यातील दुष्काळी परिस्थिती बघता यावर्षी खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप ३0 जूनपर्यंत करण्याचे उद्दिष्ट सर्व बँकांना देण्यात आले होते. ही मुदत मंगळवारी संपली असली तरी ५0 टक्के पीक कर्जाचे वाटप जिल्ह्यात होऊ शकले नाही. त्यामुळे सर्व बँकांना पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्जाचे वाटप करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याने आता बँकांनी कारवाईला सामोरे जाण्याची तयारी करावी, असा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आढावा बैठकीत उपस्थित सर्व बँकांच्या अधिकार्यांना दिला. गतवर्षी खरिपासोबत रब्बी हंगामातही निसर्गाचा फटका शेतकर्यांना बसला. नापिकीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. नव्या हंगामाची तयारी करताना शेतकर्यांना बी-बियाण्यांसाठी पैसे मिळावे म्हणून राज्य शासनाने खरीप हंगामात पीक कर्जाचे वाटप वेळेत करण्याचे निर्देश दिले होते. ३0 जूनपर्यंंत १00 टक्के पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्टही सर्व राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांना देण्यात आले होते; मात्र ३0 जूनची मुदत संपल्यानंतरही जिल्ह्यात बहुतांश बँकांना ५0 टक्केही उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. त्यामुळे १५ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने पीक कर्ज वाटप दिलेल्या मुदतीत न करणार्या बँकांवर आता शासनाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकार्यांनी आढावा बैठकीत दिला. या बैठकीला लिड बँकेचे जिल्हा प्रमुख टी.डी. गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, जिल्हा कृषी अधीक्षक, सर्व बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.