वादळवाऱ्यासह पुन्हा अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान; घरांवरील टिनपत्रे उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 12:08 PM2020-04-05T12:08:53+5:302020-04-05T12:09:12+5:30
विजेच्या कडकडाटांसह वादळवाºयामुळे गहू, कांदा पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले.
अकोला: जिल्ह्यात अनेक गावांमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास वादळवाºयासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. विजेच्या कडकडाटांसह वादळवाºयामुळे गहू, कांदा पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गत काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे तिसºयांदा संकट कोसळले. पिकांचे नुकसान होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोला, तेल्हारा तालुक्यांतील काही भागांमध्ये वादळवारा व विजेच्या कडकडाटांसह पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. कुठे जोरदार पाऊस झाला, तर कुठे कमी प्रमाणात पाऊस झाला; परंतु वाºयाचा वेग मोठा असल्याने पातूर तालुक्यातील वाडेगाव, दिग्रस, तांदळी भागातील शेतामधील गहू, कांदा पिकांसह लिंबूवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटांसह अनेक भागात पाऊस कोसळला. बाळापूर शहरासह तालुक्यातील पारस, हातरूण, बोरगाव वैराळे, सोनाळा, अंदुरा, अकोला तालुक्यातील वल्लभनगर, म्हातोडी परिसरात, पातूर तालुक्यातील शिर्ला, सस्ती, भंडारज, वाडेगाव, दिग्रस, व्याळा, बेलुरा खुर्द, हिंगणा व तांदळी परिसरातही जोरदार पाऊस झाला. बेलुरा, हिंगणा, तांदळी गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वादळवारा व अवकाळी पावसामुळे या परिसरातील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. यासोबतच बेलुरा, नया अंदुरा, मनात्री, कारंजा रमजानपूर परिसरातही मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतात सोंगणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
बाळापूर राष्ट्रीय महामार्गावर झाड कोलमडले!
दुपारी झालेला पाऊस व वादळवाºयामुळे बाळापूरलगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील नाक्यावर मोठा निंबाचा वृक्ष कोलमडला. हा वृक्ष कोलमडून पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अखेर बाळापूर नगर परिषदेने क्रेनच्या साहाय्याने हा निंबाचा वृक्ष बाजूला करून रस्ता मोकळा केला.