नालीच्या सांडपाण्यामुळे 'सर्वोपचार'मध्ये दुर्गंधी; रुग्णांच्या आरोग्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 06:25 PM2019-02-02T18:25:32+5:302019-02-02T18:26:52+5:30
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड क्रमांक सहा, सातच्या पाठीमागील बाजूस नालीचे सांडपाणी साचून आहे. त्यातच कचरा व शिळे अन्न टाकण्यात येत असल्याने वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड क्रमांक सहा, सातच्या पाठीमागील बाजूस नालीचे सांडपाणी साचून आहे. त्यातच कचरा व शिळे अन्न टाकण्यात येत असल्याने वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची संख्या जास्त आहे. रुग्णांच्या नातेवाइकांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे बारकोड असलेली पास प्रणाली सुरू करण्यात आली आहे; परंतु दररोज हजारो रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या नातेवाइकांची होणारी गर्दी यावर नियंत्रण मिळविणे शक्य नाही. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालय परिसरात अस्वच्छताही वाढली आहे. यासोबतच येथील सेफ्टिक टँक, नालीचे सांडपाणी वॉर्ड क्रमांक सहा, सातच्या मागील बाजूस साचून राहते. याच पाण्यात शिळे अन्न व इतर कचराही टाकण्यात येतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचाही धोका वाढला आहे. याकडे मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अस्वच्छतेच्या मुद्यावर विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले; मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात
अस्वच्छता अन् दुर्गंधीमुळे केवळ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचाचेच नाही, तर येथे कार्यरत डॉक्टर, परिचारिका तसेच कर्मचाºयांचेही आरोग्य धोक्यात आहे. याच वातावरणात त्यांना दिवस-रात्र रुग्णसेवा करावी लागते. अशा परिस्थितीत शासकीय वैद्यकीय प्रशासनातर्फे योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे.
जवळच बालरुग्णांचा वॉर्ड
नालीतील सांडपाणी साचून असलेल्या जागेपासून जवळच बालरुग्णांचा वॉर्ड आहे, तर दुसरीकडे प्रसूती वॉर्ड. सांडपाण्यामुळे या भागात डासांचेही साम्राज्य असल्याने बालरुग्णांना डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची शक्यता आहे.