अडगाव बु. येथे दोन गटात हाणामारी
By admin | Published: March 15, 2017 02:45 AM2017-03-15T02:45:27+5:302017-03-15T02:45:27+5:30
एक गंभीर ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
हिवरखेड (अकोला), दि. १४- हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या अडगाव बु. येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
अडगाव येथील संजय रामदास राजनकर (२५) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, गावातीलच श्याम कोल्हे, शुभम नांदुरकर व श्रीकांत सुलताने या तिघांनी संगनमत करून कोणतेही कारण नसताना धुळवडीच्या दिवशी दुपारी ३ वाजता दरम्यान माझा पुतण्या प्रफुल्ल अशोक राजनकर (२१) याला लोखंडी पाइपने मारहाण केली. प्रफुल्ल राजनकर हा गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध भादंवि ३२४, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले, तर याचप्रकरणी दुसर्या गटाने श्रीकांत लक्ष्मण सुलताने (२४) रा. देवीपुरा अडगाव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, श्याम कोल्हे हे त्यांच्या हार्डवेअर दुकानात हजर असताना अडगावातीलच पंकज देशमुख, प्रवीण राजनकर, श्याम नाठे, प्रफुल्ल राजनकर यांनी हार्डवेअरच्या दुकानात घुसून लोखंडी पाइपने मारहाण, नासधुस व शिवीगाळ केली. या मारहाणीत श्याम कोल्हे हे जखमी झाले असून, त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवरखेड येथे उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी उपरोक्त चौघांविरुद्ध भादंवि ३२४, ५0४, ४२७, ४५२, ३३६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केले. सदर घटना सोमवार, १३ मार्च धुळवडच्या दिवशी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. या घटनेमुळे अडगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हाणामारी प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे, हवालदार जगदीश पुंडकर, राजेश भगत करीत आहेत.