मनपात वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा; शासनाकडे पाठपुरावा नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:45 AM2020-03-17T11:45:33+5:302020-03-17T11:45:40+5:30
सत्तापक्ष भाजपाकडून शासनाकडे ठोस पाठपुरावा होत नसल्याने समस्येत भर पडली आहे.
अकोला : महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा निर्माण झाल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित झाल्याचे चित्र आहे. मनपाच्या आर्थिक कारभारावर देखरेख ठेवणाºया मुख्य लेखा परीक्षकांचे पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने प्रशासनाची आर्थिक घडी विस्कटल्याची परिस्थिती आहे. अशा स्थितीत मनपासह सत्तापक्ष भाजपाकडून शासनाकडे ठोस पाठपुरावा होत नसल्याने समस्येत भर पडली आहे.
मनपाचा प्रशासकीय कारभार सुरळीत चालण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. मनपात वरिष्ठ अधिकाºयांची अनेक पदे रिक्त असल्याने असमतोल निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्य लेखा परीक्षक, उपायुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, कर मूल्यांकन अधिकारी, अग्निशमन अधिकारी, स्वच्छता व आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्त आदी महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. मनपाचे उपायुक्त विजयकुमार म्हसाळ मागील अनेक दिवसांपासून दीर्घ रजेवर असल्याने त्यांचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त वैभव आवारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आज रोजी उपायुक्त रंजना गगे, कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, सहायक आयुक्त वैभव आवारे, सहायक आयुक्त पूनम क ळंबे यांच्या माध्यमातून मनपा आयुक्त संजय कापडणीस प्रशासनाचा गाडा हाकत असल्याचे दिसत आहे. साहजिकच, संबंधित अधिकाºयांवर प्रशासकीय कामकाजाचा ताण येत असल्याची चर्चा मनपाच्या वर्तुळात सुरू आहे.
उपायुक्त म्हसाळ आहेत कोठे?
मनपाच्या उपायुक्तपदी नियुक्त झालेले विजयकुमार म्हसाळ रुजू झाले खरे; परंतु ते रमलेच नसल्याचे दिसून आले. मागील अनेक दिवसांपासून ते दीर्घ रजेवर आहेत. त्यांनी बदलीसाठी प्रयत्न चालविल्याची माहिती असली तरी अनेक महिन्यांपासून बदली न झाल्यामुळे उपायुक्त म्हसाळ आहेत कोठे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
प्रशासन अस्थिर ठेवण्याचा घाट
मनपात वरिष्ठ अधिकाºयांची वानवा असली म्हणजे स्थानिक अधिकाºयांच्या माध्यमातून अपेक्षित कामे करता येणे पदाधिकारी-नगरसेवकांना सहज शक्य होते. वेळप्रसंगी मनाजोगती कामे करून घेण्यासाठी स्थानिक अधिकाºयांवर दबावतंत्राचाही वापर के ला जातो. अर्थात प्रशासन अस्थिर ठेवण्याकडेही अनेकांचा कल असल्याचे बोलल्या जाते.
मुख्य लेखापरीक्षकांचे पद रिक्त असून, त्यामुळे मनपाचा आर्थिक कारभार विस्कळीत झाला आहे. यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला असून, अधिकाºयाच्या नियुक्तीची प्रतीक्षा आहे.
- संजय कापडणीस आयुक्त, मनपा