बीएसएफ जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By admin | Published: September 28, 2015 02:11 AM2015-09-28T02:11:10+5:302015-09-28T02:11:10+5:30
नांदुरा तालुक्यातील जवानाचा २५ सप्टेंबर रोजी कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता.
नांदुरा (जि. बुलडाणा): सीमा सुरक्षा दलात गुजरातमधील गांधीनगर येथे कार्यरत असलेल्या नरेश हिवराळे या जवानाचा २५ सप्टेंबर रोजी कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर नांदुरा तालुक्यातील डिघी या मूळ गावी २७ सप्टेंबरला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेश तोताराम हिवराळे (४५) यांचा कर्तव्यावर असताना गांधीनगर (गुजरात) येथे २५ सप्टेंबरला रात्री दोन वाजता मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव सैन्यदलाने रेल्वेद्वारे मलकापूर येथे आणले. नंतर त्यांच्या जन्मगावी डिघी येथे ते नेण्यात आले. तेथे नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हवेत दहा फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. मृत जवान नरेश तोताराम हिवराळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करते वेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार अहिरे, सीमा सुरक्षा दलाचे आठ जवान, पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश गवई, कोलते, कानडजे, यांच्यासह आमदार चैनसुख संचेती, भाई अशांत वानखडे यांच्यासह गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मृत बीएसएफ जवान नरेश तोताराम हिवराळे यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला, ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही.