ऑक्सिजन पुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:29+5:302021-04-25T04:18:29+5:30
अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा कहर सुरूच असून, कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत ...
अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा कहर सुरूच असून, कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने, रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मागणीच्या तुलनेत जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा कमी होत असल्याने, ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा टॅंकर केव्हा येतो, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरावा करावा लागत आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अकोल्यातील एमआयडीसी भागात दोन ऑक्सिजन प्लांटवर जाऊन दररोज ऑक्सिजन टॅंकर येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
सध्या ‘या’ ठिकाणांहून होत आहे
ऑक्सिजनचा पुरवठा!
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरकरिता जिल्ह्यात सध्या पुणे व नागपूर येथून दररोज ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. एमआयडीसी भागातील दोन ऑक्सिजन प्लांट येथे टॅंकरव्दारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.