अकोला मार्गे ओखा-मदुरै एक्स्प्रेस जानेवारी अखेरपर्यंत धावणार
By Atul.jaiswal | Published: December 31, 2023 02:36 PM2023-12-31T14:36:43+5:302023-12-31T14:36:46+5:30
या गाडीच्या अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी पाच अशा एकूण दहा फेऱ्या होणार आहेत.
अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही साप्ताहिक रेल्वे आता २९ जानेवारीपर्यंत धावणार असून, अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांना दक्षीण भारतात जाण्यासाठी थेट गाडीची सुविधा मिळाली आहे.
पश्चिम रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २५ डिसेंबर २०२३ पर्यंत अधिसुचित असलेली ०९५२० ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्सप्रेस १ जानेवारी ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीत दर सोमवारी २२:०० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होऊन चवथ्या दिवशी मदुरै स्थानकावर ११:४५ वाजता पोहोचणार आहे. २९ डिसेंबर २०२३ पर्यंत अधिसुचित असलेली ०९५१९ मदुरै-ओखा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ५ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी ०१:१५ वातजा प्रस्थान स्थानकावरून रवाना होऊन तिसऱ्या दिवशी १०:२० वाजता ओखा स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी पाच अशा एकूण दहा फेऱ्या होणार आहेत.