जुने शहरवासीयांना रस्ताच सापडेना!
By admin | Published: July 13, 2016 01:53 AM2016-07-13T01:53:20+5:302016-07-13T01:53:20+5:30
परिसर जलमय; पश्चिम झोनमध्ये नाले सफाईची पोलखोल.
अकोला: शहरात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोलेकरांची चांगलीच तारांबळ उडाली असून जुने शहरात साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी पालिका प्रशासनाने पर्यायी व्यवस्थाच न केल्यामुळे रस्त्यातून वाट शोधताना नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. यामुळे प्रशासनाने पश्चिम झोनमध्ये केलेल्या नाले सफाईवर प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत. महापालिका प्रशासनाने यंदा प्रथमच प्रशासकीय स्तरावर शहरातील नाले, गटारांची मॉन्सूनपूर्व साफसफाई करण्याची जबाबदारी चारही क्षेत्रीय अधिकार्यांवर सोपवली होती. मनपा कर्मचार्यांचा ८ जून रोजी बेमुदत संप संपुष्टात आल्यानंतर क्षेत्रीय अधिकार्यांनी नाले सफाईला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच पश्चिम झोनमधील नाले सफाईच्या कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोलेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पश्चिम झोनमध्ये थातूर-मातूर नाले सफाई केल्यामुळे पावसाचे साचलेले पाणी ठिकठिकाणी साचले आहे. डाबकी रोड परिसरातील चिंतामणी नगर, सोपीनाथ नगर, मेहरे नगर, श्री राम चौक, रेणुका नगर, गोडबोले प्लॉट, वानखडे नगर, भगतवाडी,अयोध्या नगर, गायत्री नगर आदी परिसरात पावसाचे पाणी साचले असून नागरिकांच्या घरांना पाण्याने वेढा घातल्याचे चित्र आहे. नाले-गटारांमधील घाण पाणी सखल भागातील नागरिकांच्या घरापर्यंंंत पोहोचले आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना जुने शहरवासीयांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. जुने शहर जलमय! नाले सफाईचा बोजवारा उडाल्याने पावसामुळे जुने शहर जलमय झाल्याचे चित्र आहे. शाळकरी चिमुकल्या मुलांना काखेत घेऊन महिलांना रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. वयोवृद्ध नागरिकांनी घराबाहेर निघणे बंद केल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी ऑटोचालक या भागात येण्यास तयार होत नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी नगरसेवकांसह पालिका प्रशासन कोणतेही ठोस उपाय करीत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे.