दहा वर्षीय नातवाच्या शोधासाठी वयोवृद्ध आजीची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:47 PM2019-04-17T13:47:56+5:302019-04-17T13:48:01+5:30
अकोला: हरविलेला दहा वर्षीय नातू मोहम्मद अवेसच्या शोधासाठी वयोवृद्ध, अशिक्षित आजी मुमताज मागील ९ दिवसापासून अकोल्यातील पोलीस ठाणे आणि वृत्तपत्र कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे.
अकोला: हरविलेला दहा वर्षीय नातू मोहम्मद अवेसच्या शोधासाठी वयोवृद्ध, अशिक्षित आजी मुमताज मागील ९ दिवसापासून अकोल्यातील पोलीस ठाणे आणि वृत्तपत्र कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. पोलीस यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात असल्याने या व्याकूळ वृद्ध महिलेचे शल्य समजून घेण्यास कुणाला वेळ नाही.मात्र अशिक्षित असलेल्या मुमताज यांना नातू हवा आहे.
मुजफ्फर नगरात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्धा मुमताज यांच्या विवाहित मुलीचा आणि जावयाचा सात वर्षांपूर्वी मृत्यू झाला. मातृ-पितृछत्र अकाली निघून गेल्याने मोहम्मद अवेस निराधार झाला. तो तीन वर्षांचा असताना मुमताज यांनी त्याचे पालनपोषण केले. दहा वर्षीय मोहम्मद अवेस ७ एप्रिल १९ रोजी येथून जवळच असलेल्या हक्कानिका मशीदजवळच्या पटांगणात खेळायला गेला. सायंकाळपर्यंतही तो घरी न परतल्याने त्याचा शोधाशोध सुरू झाला. अचानक आणि तेवढ्याच नाट्यमय पद्धतीने बेपत्ता झालेल्या नातवाला शोधण्यासाठी मुमताजने रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांंनी बेपत्ता झाल्याची नोंद घेतली; मात्र अशिक्षित असलेल्या मुमताजला मात्र नातू हवा आहे. दररोज ती पोलीस ठाण्यात येऊन विचारपूस करीत असल्याने पोलिसांनी आता मुमताजला वृत्तपत्राचे कार्यालय दाखविले आहे. दहा वर्षीय नातवाच्या शोधासाठी आजीची सुरू असलेली पायपीट अनेकांचे काळीज पिळवटून टाकणारी ठरत आहे.