वृद्ध आई-वडीलांचा श्याम हरवलाय..!
By admin | Published: January 28, 2015 12:41 AM2015-01-28T00:41:39+5:302015-01-28T00:41:39+5:30
जेष्ठ नागरिकाप्रती समाज संवेदनाहीन; वृद्ध आई वडीलांच्या छळाच्या घटनेत वाढ.
अकोला: कोणत्याही संकटाच्या क्षणी आई-वडील एकदम आठवतात. संकटकाळी आई-वडिलांना आठवणार्या या मुलांमधील श्याम आज कुठेतरी हरवत चाललाय; त्यामुळेच आज अनेक घरांमध्ये आई-वडिलांचा मुले अमानूष छळ करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात गेले तर तेथे दररोज मुलांची तक्रार घेऊन त्यांचे आई-वडील दिसतात. डोळय़ांमध्ये अश्रू घेऊन हे आई-वडील ठाणेदार, पोलीस कर्मचार्यांना आपली कर्मकहाणी सांगून, मुलांना समजावून सांगण्याची, त्यांचेवर कडक कारवाई करण्याची विनंती करतात. पोलीसही मुलांना बोलावून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करतात. गत काही वर्षांपासून पोलीस ठाण्यांमध्ये मुलांकडून होत असलेल्या आई-वडिलांच्या छळाच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. लहानपणी तळहातावरील फोडासारखे जपणार्या मुलांना, आई-वडील वयोवृद्ध झाल्यावर का नकोशे वाटतात. हाच चिंतेचा विषय आहे. आई.. तिच्या कुटुंबासाठी समईसारखी सतत जळत असते, तर वडील कुटुंबप्रमुख या नात्याने काटकसर करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा देतात. प्रसंगी दाढीचा साबण न वापरता मुलाला सलूनमध्ये जाण्यासाठी पैसे देतात. फाटकी बनियान घालतील; परंतु मुलाला, मुलीला नवीन बनियान देतील. अशा आई-वडिलांच्या उतारवयात ही मुले त्यांना वृद्धाश्रमात जाण्याची का वेळ आणतात. आई-वडिलांचा छळ मांडणारी हीच मुलेसुद्धा उद्या आई-वडील होतील. त्यांची मुलेही त्यांना घराबाहेर हाकलतील. वृद्धाश्रमात पाठवतील. हा विचार आज कुणीच करीत नाही.
खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगनराव इंगळे यांनी खदान पोलीस ठाण्यामध्ये दररोज आई-वडील मुलाविरुद्ध तक्रारी घेऊन येत असल्याचे सांगीतले.