चिमुकल्यांनी साजरा केला ऑलिम्पियन कर्माकरचा वाढदिवस
By admin | Published: August 10, 2016 01:09 AM2016-08-10T01:09:49+5:302016-08-10T01:09:49+5:30
अकोला येथील वसंत देसाई क्रीडांगणावर चिमुकल्यांचा पुढाकार.
अकोला , दि. 0९ : वसंत देसाई क्रीडांगणावरील मंगळवारची संध्याकाळ नेहमीपेक्षा थोडी वेगळी होती. जिम्नॅस्टिक हॉलमधील वातावरण त्याहीपेक्षा वेगळे. चिमुकल्याची गडबड सुरू होती. सरावातून वेळ काढून चिमुकले वाढदिवसाच्या तयारीला लागले. वाढदिवस कोण्या प्रशिक्षणार्थींचा नव्हता. तर भारताची अव्वल जिम्नॅस्ट आर्टिस्टिक दीपा कर्माकरचा. दीपा कर्माकरचे फॅन्स असलेल्या चिमुकल्यांनी दीपाला केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच शिवाय तिच्याकडून रिओ ऑलिम्पिकमधून सुवर्णपदकाचीही अपेक्षा व्यक्त केली.
कॉमनवेल्थ विजेती व सध्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असलेली युवा जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचा मंगळवार ९ ऑगस्ट वाढदिवस. दीपाचा तेविसावा वाढदिवस अकोल्याच्या चिमुकल्या जिम्नॅस्टिकपटूंनी मोठय़ा उत्साहात साजरा केला. अकोला जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचिव तथा वरिष्ठ जिम्नॅस्टिक प्रशिक्षक मुकेश तुंडलायत यांच्या मार्गदर्शनात दीपा कर्माकरच्या वाढदिवसाची तयारी करण्यात आली. हौशी जिम्नॅस्ट तथा कोषागार विभागातील कर्मचारी असलेले प्रकाश बागडे यांना दीपाचा वाढदिवस साजरा करावा, अशी इच्छा होती. कांबळे यांनी ही संकल्पना तुंडलायत यांच्याकडे मांडली. तुंडलायत यांनी लगेच होकार देऊन वाढदिवसाची तयारी केली. प्रशिक्षणार्थी तथा राज्यस्तर जिम्नॅस्ट ऋतुजा शेंडे ही दीपा कर्माकरसारखीच दिसत असल्याचे तिच्या मैत्रिणींचे म्हणणे आहे. त्यामुळे ऋतुजाच्याच हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाला जिम्नॅस्टिक संघटनेचे धीरेंद्र सोमवंशी, गोकुळ टापरे, उमेश तुंडलायत, प्रकाश बागडे, सचिन मांडवकर, शुभम टापरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षक मुकेश तुंडलायत यांनी दीपा कर्माकरबद्दल चिमुकल्यांना माहिती दिली.