Omicron Variant: ओमायक्रॉनने चिंता वाढवली; अकोल्यात जमावबंदी लागू, रॅली, मोर्चा अन् आंदोलनाला बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 09:03 AM2021-12-05T09:03:25+5:302021-12-05T09:13:08+5:30
कोरोना विषाणू संसर्गाची नवीन प्रजाती (व्हेरिएंट) ‘ओमायक्रॉन’ आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
अकोला: कर्नाटक आणि गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. मुंबईजवळच्या डोंबिवली येथील ३३ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. या रूग्णाला सौम्य लक्षणे असून जनतेने घाबरुन जावू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. गुजरातच्या जामनगर येथे एका ७२ वर्षीय पुरुषाला हा संसर्ग झाला. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता देशात चार झाली आहे. डाेंबिवलीत आढळलेला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि दिल्लीमार्गे २३ नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाला.
कोरोना विषाणू संसर्गाची नवीन प्रजाती (व्हेरिएंट) ‘ओमायक्रॉन’ आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ‘ओमायक्रॉन’ संसर्गाचा जिल्ह्यात संभाव्य धोका वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरोरा यांनी ४ डिसेंबर रोजी जारी केला.
अकोला जिल्ह्यातील जमावबंदीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा इत्यादींचे आयोजन करता येणार नाही, तसेच जमावबंदीच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम नियमित सुरू राहणार असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बूस्टर डोस गरजेचा-
संसर्गक्षमता खूप जास्त असल्याने काेराेनाचा ओमायक्राॅन व्हेरिएंट डेल्टाची जागा घेऊ शकताे. येणाऱ्या काळात ओमायक्राॅनचेच रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळतील. मात्र, वेगळ्या लसीची कदाचित गरज भासणार नाही, असे जागतिक आराेग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डाॅ. साैम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. डाॅ. स्वामिनाथन म्हणाल्या की, नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतून उगम पावला, याबाबतही शंकेला वाव आहे. यापूर्वी काेराेना संसर्गामुळे निर्माण झालेल्या राेगप्रतिकारशक्तीला ओमायक्राॅन चकवू शकताे. मात्र, लसी त्याच्याविरुद्ध प्रभावी ठरत असल्याचे आतापर्यंतच्या संसर्गावरून आढळले आहे. संसर्ग झालेल्यांना गंभीर आजार हाेत नाही. कदाचित बूस्टर डाेसची गरज भासू शकते, असे त्या म्हणाल्या.
गुजरातच्या जामनगरमध्ये आणखी एक बाधित -
गुजरातमध्ये संसर्ग झालेला नागरिक झिम्बाब्वे येथून भारतात परतला हाेता. विमानतळावर तपासणीदरम्यान त्याला काेराेना झाल्याचे आढळून आले. त्यानंतर अहमदाबाद येथे जिनाेम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यातून ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची ओळख पटविण्यात येत आहे. यापूर्वी कर्नाटकमध्ये ६६ आणि ४६ वर्षांच्या दाेन रुग्णांना ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले हाेते. दाेघांचेही संपूर्ण लसीकरण झाले हाेते, हे विशेष.