६४ घरांच्या पटावर दिव्यचक्षू ओमकारची डोळस कामगिरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 07:02 PM2019-11-03T19:02:40+5:302019-11-03T19:02:45+5:30
दिव्यचक्षूंच्या अडचणी, आव्हाने आणि त्यावर मात करण्याची जिद्द ओमकारमध्ये ठासून भरलेली दिसत होती.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: डोळस खेळाडू जितक्या सफाईने डाव मांडत नसतील, त्यापेक्षा अधिक अचूकपणे ६४ घरांच्या पटावरील खेळ दिव्यचक्षू असलेला ओमकार तळवळकर खेळत होता. ओमकार खेळत असताना पाहताना वरवर हे सर्व सोपे असल्याचे दिसत होते; मात्र त्यासोबतच दिव्यचक्षूंच्या अडचणी, आव्हाने आणि त्यावर मात करण्याची जिद्द ओमकारमध्ये ठासून भरलेली दिसत होती.
अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेनिमित्त ओमकार अकोल्यात आला आहे. ओमकार हा अवघ्या ११ वर्षांचा आहे. ओमकार जन्मत:च दृष्टिहीन आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रात ओमकारला बालपणापासूनच आवड आहे. जलतरण आणि बुद्धिबळ खेळात तरबेज आहे. तबला आणि पखवाज वाजविण्याचा त्याला छंद आहे. तसेच शालेय स्पर्धात्मक परीक्षादेखील त्याने उत्तीर्ण केलेल्या आहेत. ओमकार हे सर्व त्याचे वडील समीर तळवळकर यांच्या प्रोत्साहन आणि पाठबळामुळे सहज करीत आहे. वडील समीर हेच ओमकारचे डोळे आहेत. ओमकार सध्या पुणे येथील महर्षी कर्वे शिक्षण शिशू विहार येथे इयत्ता सहावीत शिकत आहे. त्याने १५ आणि ११ वर्षे वयोगटात याआधी खेळप्रदर्शन केले आहे. खुल्या गटात या स्पर्धेनिमित्त पहिल्यांदाच खेळत आहे. ओमकार ‘एआयसीएफबी’च्या स्पर्धा खेळतो. आळंदी येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या दृष्टिहिनांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी ओमकारची निवड झालेली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी व्हावी, यासाठी नियमित कसून सराव करीत असल्याचे ओमकारने सांगितले.
ओमकारला बुद्धिबळाचे प्राथमिक प्रशिक्षण त्याचे वडील समीर यांनी दिले. सध्या पुणे येथेच माधवी जोगळेकर यांच्या मार्गदर्शनात तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. ओमकारने आतापर्यंत बुद्धिबळावरील दोन पुस्तके वाचली आहेत. डाव खेळताना बेल नोट टेकरवर स्वत: खेळाची नोंद करतो. साधारणत: वयाच्या २१ व्या वर्षी दृष्टिहीन व्यक्ती कोणत्याही विषयात किंवा सामान्य जगण्यासाठी परिपक्व होतो; मात्र ओमकार वयाच्या अकराव्या वर्षीच परिपक्व झाला असून, सामान्य मुलांप्रमाणे प्रत्येक गोष्टीतील बारकावे सहज टिपतो. सामान्य खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसारच दृष्टिहीन बुद्धिबळपटूंना खेळावे लागते. ओमकारने जिल्हा पातळीवर सामान्य मुलांना पराभूत करू न दृष्टिहीन कुठेच कमी नाहीत, हे सिद्ध करू न दाखविले आहे. दृष्टिहीन खेळाडूही ६४ घरांचा शक्तिशाली राजा बनू शकतो, हे ओमकारने दाखवून दिले. ओमकारची बुद्धिबळातील वाटचाल आशावर्धक आहे. डोळस बुद्धिबळपटूंनाही ओमकार तगडे आव्हान देत आहे, एवढे मात्र निश्चित.