धुलीवंदनाच्या दिवशी तीन तलवारीसह धारदार शस्त्र जप्त
By सचिन राऊत | Published: March 26, 2024 04:19 PM2024-03-26T16:19:44+5:302024-03-26T16:20:17+5:30
होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक शांतता भंग करणाऱ्या विरूध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिले होते.
तडीपार आरोपीस केली अटक, अकोलापोलिसांनी राबविली मोहीम अकोला : जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासोबतच सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी अकोला पोलिसांनी धुलीवंदनाच्या दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी मोहीम राबवीत तीन आरोपींकडून दोन तलवारी व एक धारदार शस्त्र जप्त केले. यासोबतच एका तडीपार आरोपीसही अटक करण्यात आली आहे.
होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक शांतता भंग करणाऱ्या विरूध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिले होते. त्यानुसार डाबकी रोड पोलीस स्टेशन, पिंजर पोलीस स्टेशन व उरळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यां विरुध्द विशेष मोहिम राबवुन भारतीय हत्यार कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे आरोपी दिपक अशोकराव नंदरधने वय ४० वर्ष रा गोडपुरा डाबकी रोड तसेच पोलीस स्टेशन पिंजर हद्दीतील आरोपी गणेश अंबादास कांबळे वय ३५ वर्ष रा जमकेश्वर ता बार्शिटाकळी यांचे कडुन एक तलवार व एक कत्ता जप्त करण्यात आला आहे.
तसेच पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील तडीपार असलेला आरोपी रामा पाटील उर्फ प्रसाद साहेबराव सुलतान वय २४ वर्ष रा लोहारा ता बाळापुर हा तडीपारीचे उल्लघंन करून अवैध शस्त्र घेवुन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असतांना त्याला उरळ पोलिसांनी ताब्यात घेतले. या तीनही आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदयान्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जिल्हयात मालमत्तेच्या व शरीराविरूध्दच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरीता विशेष प्रतिबंधक मोहिम राबविल्या आहेत. तीन महिन्यात ४९ कारवाया भारतीय हत्यार कायदयान्वये एकुण ४९ कारवाई करण्यात आल्या आहेत. २०२४ या वर्षातील तीन महिन्यात एवढ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. तसेच तडीपार विरूध्द कलम १४२ मपोका प्रमाणे ०५ कारवाई करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.