आईचा वाढदिवस घरबसल्या रक्तदानाने केला साजरा; अकोल्यात तरुणांचा पुढाकार
By Atul.jaiswal | Published: June 8, 2024 05:12 PM2024-06-08T17:12:59+5:302024-06-08T17:14:14+5:30
वाढदिवस म्हटला की डेकोरेशन,पाहुणे, केक, जेवण, गोड धोड असे नानाविध खर्च आपण करत असतो.
अकोला : वाढदिवस म्हटला की डेकोरेशन,पाहुणे, केक, जेवण, गोड धोड असे नानाविध खर्च आपण करत असतो. या सर्व खर्चाला फाटा देत केशव नगर भागात राहणारे संदीप नरकाडे यांनी आपल्या मित्र परिवारासह आईचा ७७ वा वाढदिवस घरबसल्या रक्तदान करून साजरा केला. आपल्या सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत रक्तदानासारखे पुण्यकर्म केले आहे.
अकोल्यात डॉ. हेडगेवार रक्तकेंद्रातर्फे १ जून पासून घरबसल्या रक्तदान हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून अकोल्यातील अनेकजण यामध्ये पुढाकार घेत आहेत व रक्तदाना सारख्या पवित्र व अत्यंत आवश्यक कार्यात सहभागी होत आहेत.
शनिवारी भूषण काकडे, युवराज भावसार, गजानन बनसोड, राहुल शिरभाते, प्रमोद काकड, अभिषेक जोशी, सचिन ढाकुळकर, निलेश देशमुख यांनी रक्तदान केले. यावेळी सर्पमित्र बाप्पू देशमुख, यशवंत सवई, सुधीर पुंडेकर , संदीप नरकाडे, सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तपेढीचे डॉ. दिलीप पांडे, संदीप मोकाशी, सुनिल पांडे, युवराज खोडके यांनी रक्तपेढी तर्फे काम पाहिले सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तपेढीच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क करून रक्तपेढीची एसी व्हॅन आपल्या घरी, अपार्टमेंट, कार्यालय जिथे आपणास शक्य आहे तिथे बोलवून घरबसल्या रक्तदान या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र तामणे यांनी केले आहे.