वादळाने केली महावितरणची दाणादाण; शहरासह ग्रामीण भागाला फटका
By Atul.jaiswal | Published: April 10, 2023 06:06 PM2023-04-10T18:06:55+5:302023-04-10T18:07:41+5:30
रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने महावितरणची पुन्हा दाणादाण उडविली.
अकोला: रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने महावितरणची पुन्हा दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी झाडे, झाडाच्या फांद्या,टिनपत्रे विजेच्या खांबावर येऊन पडल्याने शहरातील पाच तर ग्रामीण भागातील एक असे सहा विद्युत उपकेंद्रे प्रभावित झाली होती. परिणामी निम्म्यापेक्षा अधिक भाग तर १४५ गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता. तथापी, सोमवारी दुपारपर्यंत १२० पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.
वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने बाळापूर पारस या ११ केव्ही वाहिनीवर झाड पडल्याने १२ खांब तुटले/वाकल्याने वीज वाहिनी जमिनदोस्त झाली होती. त्यामुळे ३३ केव्ही बाळापूर उपकेंद्र बंद पडले होते. याशिवाय अनेक ठिकाणी टिनपत्रे,झाडाच्या फांद्या वीज वाहिन्यावर अडकल्याने ४० ते ५० लघूदाबाचे खांब वीज वाहिन्यासहीत पडले आहेत. पारस येथील चार ठिकाणाचे रोहित्र हे जमिनीलगत झुकले आहेत. बाळापूर उपकेंद्राचा वीज पुरवठा रात्रीलाच पुर्ववत करण्यात आला आहे.
ही उपकेंद्रे पडली होती बंद
कडकडाटासह वीजा पडल्याने अकोला शहरातील ३३ केव्ही एमआयडीसी,३३ केव्ही सुधीर कॉलनी,३३ खडकी,३३ केव्ही वाशिम बायपास आणि ३३ केव्ही शिवाजी उपकेंद्राशी निगडीत वीज वाहिन्यांवरील ६० ते ७० पीन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर फुटल्याने हे उपकेंद्रे बंद पडली होती. परंतू महावितरणकडून अतीरिक्त मनुष्यबळाचा वापर करत काही तासातच शहरातील वीज पुरवठा पुर्ववत केला.
मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता फिल्डवर
मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट रात्रीपासूनच संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मुख्य अभियंता यांनी जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला व वीज दुरूस्तीच्या कामाला गती देण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर हजेरी लावली.